मुंबई- शहरातील कफ परेड परिसरामध्ये असलेला सौदी अरेबियाचा दूतावास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र पाठवणाऱ्या एका आरोपीस कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. सुजित गिडवानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
डेटिंग अॅपवर मैत्री झालेल्या महिलेसोबत लग्न करायचे होते पण तिने लग्नाला नकार दिला. याचा राग मनात धरून या आरोपीने तिच्या नावाने पत्र सौदी अरेबियाच्या दूतावसाला पाठवले होते. याबरोबरच वर्सोवा मधील एक शाळासुद्धा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र या आरोपीने पोस्टाद्वारे पाठवले होते. या प्रकरणी पोलिसांनी अंधेरी लोखंडवाला परिसरातून सुजित गिडवानी या आरोपीला अटक केली आहे.
असा लागला आरोपीचा शोध
सौदी अरेबिया दूतावसाला बॉम्बने उडवून देणारे धमकीचे मिळालेले पत्र हे कफ परेड पोलिसांना देण्यात आल्यानंतर यासंदर्भात चौकशी करण्यात येते होती. या पत्रामध्ये एका महिलेचे नाव व तिच्या घरचा पत्ता लिहिण्यात आलेला होता. त्या महिलेला पोलिसांनी गाठून तिची चौकशी केली असता, सुजित नावाच्या व्यक्ती सोबत गेल्या काही महिन्यांपासून तिथे खटके उडत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. सुजितने लग्नाला मागणी केल्यावर आपण नकार दिला होता. याचा राग मनात धरून या महिलेला धडा शिकवण्यासाठी जुहू पोस्ट ऑफिस येथून ते पत्र आरोपीने पाठवले होते.