मुंबई- पावसाळ्यापूर्वी शहरात नालेसफाई केली जाते. मुंबई शहर विभागात बंदिस्त नाले असल्याने यावर्षी रोबोटने नालेसफाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, या रोबोटमुळे अनेक ठिकाणी नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याने पावसाळ्यात मुंबई तुंबणार अशी भिती नगरसेवकांनी स्थायी समितीत व्यक्त केली. रोबोटचा प्रयोग अपयशी ठरल्याने रोबो आणणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थायी समितीत नगरसेवकांनी केली.
दरवर्षी मान्सूनपुर्वी ७० टक्के नालेसफाईची कामे केली जाते. त्याकरिता कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते. परंतु, पावसाच्या पहिल्या दणक्यातच प्रशासनाचा दावा वाहून जातो. प्रशासनाचा गलथान कारभार याला कारणीभूत आहे. यंदाही मोठ्या नाल्यांची सफाई झालेली नाही. बहुतांश नाल्यात अद्याप गाळ आहे. रेल्वेला लागून असलेले मोठे नालेही गाळांनी भरले आहेत.