मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. परंतु त्यांनी आमचा विश्वासघात केला असल्याची प्रतिक्रिया आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरळीतील पदाधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. सचिन अहिर हे शिवसेनेत गेले असले तरी आम्ही कायम राष्ट्रवादी सोबतच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी निर्णय घेतला. सकाळी काही कार्यकर्त्यांची त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला म्हाडाकडे, या असे सांगितले. त्यानुसार आम्हीही गेलो. परंतु, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरी जातील, असे वाटले नव्हते. त्यानंतर ते शिवसेनेत जाणार असल्याचे समजताच आम्ही तेथून परत निघालो, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.