मुंबई -पावसाळ्यात हिवताप, डेंगू आदी रोगांचे प्रमाण रोखण्यासाठी अळीनाशक फवारणी केली जाणार आहे. यासाठी ४५ स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार असून हे काम सुरू करण्यासाठी सहकारी संस्था, बेरोजगार सेवा सहकारी संस्थेसोबत करार केला जाणार आहे. पालिका यासाठी तब्बल ९२ लाख रुपये खर्च करणार आहे.
डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी पालिका स्वयंसेवकांवर ९२ लाख खर्च करणार - MUNCIPAL CORPORATION
४५ स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार असून हे काम सुरू करण्यासाठी सहकारी संस्था, बेरोजगार सेवा सहकारी संस्थेसोबत करार केला जाणार आहे. पालिका यासाठी तब्बल ९२ लाख रुपये खर्च करणार आहे.
पावसाळ्यात नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. यावर नियंत्रण ठेवण्याच्यादृष्टीने पालिकेकडून डासांच्या उत्पत्तीस्थानांची तपासणी करून बांधकामाच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणी अळीनाशक फवारणी व धुम्रफवारणी करण्यात येते. पालिकेच्या किटकनाशक विभागामार्फत सहकारी संस्था व बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून स्वयंसेवकांची ५ आणि ७ महिन्यांसाठी नियुक्ती केली जाते.
या पार्श्वभूमीवर यंदाही नियुक्तीसाठी स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यानुसार बांधकामाच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणी अळीनाशक फवारणीसाठी सात महिन्यांच्या कालावधीसाठी ३५ लाख ६२ हजार ४४६ रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. यासाठी, पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर या ५ महिन्यांच्या कालावधीसाठी २० लाख ५२ हजार ६४७ रुपये इतका खर्च करून २० स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी एकूण ४५ स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार असून त्यासाठी ९२ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.या कामासाठी सहकारी संस्था, बेरोजगार सेवा सहकारी संस्थेसोबत करार केला जाणार आहे. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.