मुंबई -पाणी बिल थकीत असलेल्या ग्राहकांसाठी महापालिकेकडून ‘अभय योजना २०२०’ १५ फेब्रुवारी, २०२० पासून राबवण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत ५६ हजार ९६४ जल-जोडणी धारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यात ३०.५५ कोटी रुपयांची सूट देण्यात आली. तर ग्राहकांनी १३८.१९ कोटी रुपयांचा भरणा महापालिकेकडे केला. या योजनेला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेत, या योजनेला आता दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत देण्यात आली आहे.
... तर अतिरिक्त आकारणी -
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आपल्या क्षेत्रातील सव्वा कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दररोज सरासरी ३ हजार ८५० दशलक्ष लीटर (३८५ कोटी लीटर) पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. देशातील सर्वात शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरविणारी महानगरपालिका, असा लौकिक असणारी महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरेशा प्रमाणात मिळावे, यासाठी तब्बल ३ हजार ४०० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च करते. यासाठी नागरिकांद्वारे भरणा करण्यात येणाऱ्या पाणी देयकांच्या रकमेचा सुयोग्यप्रकारे व नियोजनपूर्वक विनियोग करण्यात येतो. ही बाब लक्षात घेता, सुव्यस्थित पाणीपुरवठा नियमितपणे व्हावा, याकरिता नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचे अधिदान हे जलदेयकाच्या दिनांकापासून एका महिन्यात भरणे बंधनकारक आहे. तसेच एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते.
अभय योजना २०२० -
देयकाच्या रकमेवर साधारणपणे दर महिन्याला २ टक्के यानुसार ही आकारणी केली जाते. या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी ‘अभय योजना २०२०’ ही १५ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली. या योजनेला मिळत असलेला नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लक्षात घेत ‘अभय योजना २०२०’ला आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
हेही वाचा -मुंबईकरच आता मुंबईकरांचा जीव वाचवणार, महापालिकेकडून धोकादायक भागांचा सर्व्हे
३१ डिसेंबरपर्यंत लाभ घ्या -
जल-जोडणी ग्राहकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या प्रलंबित जल देयकातील जलआकार, मलनिःसारण आकार आणि जलमापक भाडे यांचे एकरकमी अधिदान करावे. तसेच अभय योजनेच्या कालावधीतील सर्व जल देयकांची बिले ३१ डिसेंबर २०२० पूर्वी करुन या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता जलकामे यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत-जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
योजनेबाबत -
अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी ‘अभय योजना २०२०’ १५ फेब्रुवारी, २०२० पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेला मिळत असलेला नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत ५६ हजार ९६४ जल-जोडणी धारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत दिनांक ३१ ऑक्टोबरपर्यंत जल-जोडणी धारकांकडून १३८.१९ कोटी रुपयांचा भरणा महापालिकेकडे करण्यात आला आहे. तर या योजनेअंतर्गत महानगरपालिकेद्वारे देखील तब्बल ३०.५५ कोटी रुपयांची सूट जल-जोडणी धारकांना देण्यात आली आहे. या योजनेला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेत, या योजनेला आता दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.