महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महापालिका आयुक्त-मुख्यमंत्री भेट नाही, कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी 'तारीख पे तारीख' - mumbai mnc employee

पालिका कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा आणि त्यांचे इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे, यासाठी मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने 23 ऑक्टोबरला पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे. मात्र, या बैठकीत बोनसबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

mumbai mnc
मुंबई मनपा

By

Published : Oct 28, 2020, 8:52 PM IST

मुंबई - दिवाळी जवळ येताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बोनस अर्थात सानुग्रह अनुदानाची चर्चा सुरू होते. यंदाही अशी चर्चा सुरू झाली आहे. पालिका आयुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बोनस जाहीर करतील असे 23 ऑक्टोबरला सांगण्यात आले. मुख्यमंत्री न भेटल्याने 26, 27, 28 ऑक्टोबरला भेट होईल असे सांगण्यात आले. आता पुन्हा 30 ऑक्टोबरला भेट होईल सांगण्यात आले आहे. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी 'तारीख पे तारीख' दिली जात असल्याने बोनस कधी जाहीर होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना युनियनने 17 हजार रुपये बोनस दिल्याचे फलक लावल्याने ही युनियन तोंडघशी पडल्याची पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

  • किती हवा बोनस -

मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून या विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्या विविध विभागातील कामगार कार्यरत आहेत. कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ, डॉक्टर, अभियंते, विविध खात्यातील कंत्राटी कामगार यांनी याकाळात जीवाची पर्वा न करता जोखीम पत्करून आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे त्यांना प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी एकूण उत्पन्नाच्या २० टक्के सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी युनियनेचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली. याबाबत बने यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्रदेखील लिहिले आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री अध्यक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या म्युनिसिपल मजदूर संघाने महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सर्व पक्षीय गटनेते, पालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. पत्रात कोरोना काळात पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले आहे. त्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी ५० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी केली असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी दिली.

  • तारीख पे तारीख -

दरम्यान, पालिका कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा आणि त्यांचे इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे, यासाठी मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने 23 ऑक्टोबरला पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे. मात्र, या बैठकीत बोनसबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आयुक्तांनी बोनसबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून किती बोनस दिला जाऊ शकतो, याची माहिती दिली जाईल असे सांगितल्याची माहिती देवदास यांनी दिली. बोनसबाबत 23 ऑक्टोबरला बैठक झाली. त्यानंतर आयुक्त आणि मुख्यमंत्री यांची भेट झालेली नाही. आयुक्त आणि मुख्यमंत्री यांची भेट होणार असल्याचे 26, 27 आणि नंतर आज 28 ऑक्टोबरलाही सांगण्यात आले. मात्र, आयुक्त आणि मुख्यमंत्री यांची भेट झालेली नाही.

आता पुन्हा 30 ऑक्टोबरला आयुक्त आणि मुख्यमंत्री भेट होईल, असे सांगण्यात आले आहे. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी 'तारीख पे तारीख' दिली जात असल्याने बोनस कधी जाहीर होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • शिवसेना युनियन तोंडघशी पडली -

पालिका कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा अशी मागणी केली जात आहे तर त्यासाठी आयुक्त आणि मुख्यमंत्री यांची भेट झालेली नाही. यामुळे बोनसचा निर्णय अद्याप झालेला नाही. बोनसचा निर्णय झाला नसताना पालिकेतील म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने 17 हजार रुपये बोनस जाहीर झाल्याचे फलक महापालिका मुख्यालयात लावले आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त यांची भेट झाली नसल्याने या फलकाबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत शिवसेनेने लावलेले फलक.

ABOUT THE AUTHOR

...view details