मुंबई - मुंबईमधील धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत गेल्या वर्षभरात आज सातव्यांदा कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. महापालिकेची टीम आणि नागरिक एकत्र आले तर कशावरही मात करू शकतात हे धारावीकरांनी करून दाखवले आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच धारावीकरांनी जी साथ दिली त्याबद्दल आभारही मानले आहेत.
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर पालिका टीम, धारावीकरांचे कौतुक -
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार सुरु असताना धारावी हॉटस्पॉट बनली होती. मात्र, महापालिकेने त्यात धारावी मॉडेल राबवत रुग्णसंख्या सातवेळा शून्यावर आणली आहे. त्यानिमित्ताने मुंबईच्या महापौरांनी धारावीकरांचे आभार मानले आहेत. 'धारावीत लोक दाटीवाटीने राहतात. तरीही येथील नागरिकांनी नियमांचे पालन केले. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम' धारावीकरांनी यशस्वी केली. पालिकेचे धारावी विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि त्यांच्या टीमने योग्य नियोजनबद्ध काम केले. धारवीकरांनी जे करून दाखवले आहे. त्यात सातत्य राखण्याची गरज आहे', असे मत महापौरांनी व्यक्त केले आहे.
धारावी सातव्यांदा शून्यावर -
मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसारख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीही कोरोनाने हॉटस्पॉट ठरली होती. १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. जुलै - ऑगस्टनंतर धारावीत रुग्ण संख्या घटत गेली. त्यानंतर दोन अंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली. २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ रोजी दुसर्यांदा, २६ जानेवारीला तिसर्यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा, २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. मुंबईसह धारावी फेब्रुवारीनंतर पुन्हा कोरोनाचा प्रसार झाला त्यानंतर धारावीत आज १४ जून रोजी सातव्यांता एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
धारावी मॉडेल -
१ एप्रिल २०२० ला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट' बनली होती. मात्र, पालिकेने संपूर्ण यंत्रणा राबवून विविध उपाययोजना सुरू केली. कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न' राबवण्यात आला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग हे ४ टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. धारावीत राबवण्यात आलेल्या मॉडेलची चर्चा देशभरात करण्यात आली तसेच हे मॉडेल अनेक ठिकाणी राबवण्यात आले आहे.
हेही वाचा -Adani Lost 55k Cr, अदानींचे एका दिवसात 55 हजार कोटींचे नुकसान, असा बसला फटका