महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांवर सरकार आणि पालिकेचे लक्ष - latest corona update

वाढत्या कोरोना रुग्णांच्या चिंताजनक आकडेवारीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका मुख्यालयातील वॉर रूममध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोना झालेल्या रुग्णाचा ज्या लोकांशी संपर्क आला त्या सर्वांची माहिती घेऊन त्यांना 'क्वारेंटाईन' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर

By

Published : Mar 31, 2020, 10:36 PM IST

मुंबई - शहर आणि महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या चिंताजनक आकडेवारीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका मुख्यालयातील वॉर रूममध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोना झालेल्या रुग्णाचा ज्या लोकांशी संपर्क आला त्या सर्वांची माहिती घेऊन त्यांना 'क्वारेंटाईन' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अशा लोकांची माहिती मिळवण्यासाठी तळागाळात जाऊन काम केले जावे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

जगभरात पसरलेल्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आणि मुंबईत रोजच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्याची चिंता व्यक्त करत, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात आढावा बैठक घेतली.

या आढावा बैठकीत, कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा सर्वांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आशा वर्कर आणि सीएचव्ही वर्कर यांच्या माध्यमातून गोळा करून त्या सर्वाना 'होम क्वारेंटाईन' केले जाणार आहे. रुग्णाच्या सहवासात आलेल्या लोकांना 'क्वारेंटाईन' केल्याने कोरोनाचा प्रसार थांबवता येणे शक्य असल्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. 'क्वारेंटाईन' करण्यासाठी विभागवार रिकाम्या इमारती, हॉल, सभागृह, रुग्णालये, हॉटेल आदी ठिकाणे शोधून त्याची माहिती पालिकेला देण्याचे आदेश वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे महापौरांनी सांगितले.

आशा वर्कर आणि सीएचव्ही वर्कर यांच्या माध्यमातून घरा-घरात सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणात सर्दी, खोकला, ताप असलेला रुग्ण आढळल्यास त्यांच्यासाठी वेगळी ओपीडी सुरू केली जाणार आहे. त्यांच्यासाठी वेगळी आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. सर्वेक्षण करणाऱ्या आशा वर्कर आणि सीएचव्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी मास्क, ग्लोज आदी वस्तू दिल्या जाणार आहेत. जे डॉक्टर आपले दवाखाने बंद करून बसले आहेत, त्यांनाही मास्क, ग्लोज, सॅनिटायझर, चेहऱ्यासमोर एक प्लास्टिक असलेले मास्क आदी सुरक्षित वस्तू देण्यात येतील.

प्रत्येक विभागात कामगार, हमाल किंवा इतरांना जेवणाची सोय होईल अशा ४ ते ५ जागा निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना १५ दिवस पुरेल इतके अन्न देण्यासाठी केंद्र उभारली जाणार आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली. नागरिकांना घराबाहेर येऊ नये, असे नियम घालून दिले आहेत. ते सर्व नियम सर्वानी पाळले पाहिजेत, असे आवाहन करताना कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तर मुंबईत आवरणे मुश्कील होईल, अशी भीती महापौरांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details