मुंबई- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया संपल्याने दुष्काळग्रस्तांसाठी उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर मुंबईमधील विकासकामे आणि पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.
मार्च महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात चार टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. चौथ्या टप्प्यात राज्यातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मतदान झाले. महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात मतदान झाल्याने राज्य सरकारने आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याअनुषंगाने दुष्काळाची कामे आणि दुष्काळग्रस्तांना मदत करता यावी म्हणून आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे.