महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Politics : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, काँग्रेस, राष्ट्रवादीचा अद्याप सेनेला पाठिंबा नाही - महाराष्ट्र विधानसभा रणसंग्राम

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुंबईमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये सेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याची भूमिका दोन्ही पक्षांनी स्पष्ट केली. तसेच आम्ही चर्चा करून विचारधारेनुसारच पुढील पाऊल उचलू, असे देखील अहमद पटेल म्हणाले.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट

By

Published : Nov 12, 2019, 7:55 AM IST

Updated : Nov 12, 2019, 10:53 PM IST

मुंबई -भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनादेखील सत्ता स्थापन करू शकली नाही. मात्र, त्यांनी राज्यपालांना वेळ वाढवून मागितला होता. त्यांनी तो वेळ नाकारला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला विचारणा केली. मात्र, राष्ट्रवादीने देखील अवधी मागितला होता. राज्यपालांनी त्यांना देखील वेळ वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुंबईमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये सेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याची भूमिका दोन्ही पक्षांनी स्पष्ट केली. तसेच आम्ही चर्चा करून विचारधारेनुसारच पुढील पाऊल उचलू, असे देखील अहमद पटेल म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत राज्यपालांना टोला लगावला. तसेच सेनेने आघाडीसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपनेच शुभेच्छा दिल्या असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच राज्यपालांनी सेनेला वेळ वाढवून न दिल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दिवसभरातील घडामोडी :

  • 10.00 PM - आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हॉटेल रिट्रीटमध्ये आमदारांसोबत थांबले असून उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले आहेत.
  • 9.20 PM - नारायण राणेंचे मत वैयक्तिक असून याप्रकारचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीमध्ये निर्णय झाला नसल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
  • 8.51 PM - काही पक्षांनी जनादेशाचा अपमान केला. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागली, असा अप्रत्यक्ष टोला सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला आहे. तसेच भाजप आता 'वेट अँण्ड वॉच' च्या भूमिकेत असून योग्यवेळी भूमिका स्पष्ट करू, असे सूचक वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले.
  • 8.35 PM - सरकार स्थापनेसाठी वाट्टेल ते करू. लवकरच १४५ आमदारांची यादी घेऊन राज्यपालांकडे जाणार आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला.
  • 7.45 PM - काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्यापही निर्णय नाही. आता विचारधारेनुसारच पुढील निर्णय घेणार असल्याचे अहमद पटेल म्हणाले.
  • 7.17 PM - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
  • 7.00 PM - शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता. राष्ट्रपती राजवटीच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा उद्या विचार करू, असेही सेनेच्या वकिलांनी सांगितले.
  • 6.55 PM - वाय. बी. चव्हाण सेंटरच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढण्यात आली.
  • 6.53 PM - पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या दबावाखाली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली असल्याचा काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांचा आरोप
  • 6.35 PM - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांच्या भेटीसाठी रिट्रीट हॉटेलमध्ये दाखल. त्यांच्यासोबत रामदास कदम देखील आहेत.
  • 6.00 PM - निवडणुकीचे निकाल लागून १५ दिवस झाल्यानंतर देखील एकही राजकीय पक्ष सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्याचे मत राज्यपालांचे झाले. त्यामुळे राष्ट्रपती राजवट हाच एक पर्याय असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले आहे.
  • 5.38 PM - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू
  • 5.31 PM - भाजपची सायंकाळी साडेसहा वाजता वर्षा निवासस्थानी बैठक. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
  • 5.21 PM - काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले.
  • 4.52 PM - काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल मुंबईत दाखल झाले आहेत. आता त्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा होणार आहे.
  • 3.37 PM - राज्यपालांनी शिवसेनेला वेळ वाढवून दिली नाही. आता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. राज्यपालांनी वेळ वाढवून न देता निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे अनिल परब यांनी ही याचिका दाखल केली असून कपिल सिब्बल शिवसेनेकडून बाजू मांडणार आहेत.
  • 3.34 PM - राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राज्यवट लावण्यासारखी परिस्थिती असल्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केलेली आहे. त्यासंबंधित पत्र देखील पाठवले आहे.
  • 2.45 PM - दिल्लीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, केसी वेणुगोपाल यांची संध्याकाळी 5 वाजता शरद पवार यांच्यासोबत बैठक होणार
  • 2.39 AM -राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची पत्रकार परिषद - पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
  • बैठकीत ठराव - राजकीय अस्थिरतेवर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांना पूर्ण अधिकार देण्यात आले.
  • सरकार स्थापनेसाठी काँग्रेसपक्षासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेणार
  • दिल्लीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, केसी वेणुगोपाल नेते मुंबईत पवारांसोबत चर्चा करणार आहेत.
  • काँग्रेस पक्षाला सोबत घेऊनच पढील निर्णय घेऊ
  • 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार अशक्य
  • 2.36 AM - राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक संपली. सर्व 54 आमदार उपस्थित
  • 2.35 AM - विजय वडेट्टीवार - सत्तास्थापनेबाबत आमचा निर्णय झाला आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर हाय कमांडसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. आमची पुढील चर्चा मुंबईत होणार आहे.
  • 2.32 AM - राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याला भाजप जबाबदार - विजय वडेट्टीवार
  • 2.23 PM - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात डीडी न्यूजने या संदर्भात ट्विट केले आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही आदेश दिले नसल्याची माहिती राजभवनातील ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला दिली.
  • 2.18 PM - राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राजभवन मधून कुठल्या प्रकारच्या हालचाली अथवा आदेश जारी करण्यात आले नसल्याची माहिती राजभवन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली
  • 2.00 PM - पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलला रवाना होण्यापूर्वी बोलावली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
  • 1.33 PM - सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांना पाठिंबा देणार नाही - असदुद्दीन ओवैसी, मला आनंद होत आहे, जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला तर जनतेला कळेल की, कोणता पक्ष कोणाची मदत खात होता तसेच कोण कोणासोबत काम करत होता.
  • 1.25 PM - शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतरच निर्णय घेणार - मल्लिकार्जुन खर्गे
  • 12.41 AM - भाजप नेते आशिष शेलार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर लीलावती रूग्णालयातून रवाना
  • 12.39 AM - एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करणे ही आपली परंपरा - आशिष शेलार, संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
  • 12.30 AM - काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि अहमद पटेल आणि केसी वेणूगोपाल मुंबईत शरद पवार यांच्या भेट घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये सकाळी फोनवर संवाद झाला आहे.
  • 12.19 AM - उद्धव ठाकरे संजय राऊत यांची लीलावती रूग्णालयात भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर परतले
  • 12.18 AM - भाजप नेते आशिष शेलार लीलावती रूग्णालयात संजय राऊत यांच्या भेटीला
  • 12.15 AM - काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि अहमद पटेल मुंबईत येणार, शरद पवार यांची घेणार भेट, चर्चा झाल्यावरच पुढील निर्णय घेणार असल्याचे केले स्पष्ट
  • 12.13 AM - संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर उद्धव ठाकरे लीलावतीहून रवाना
  • 11.52 AM - उद्धव ठाकरे लीलावती रूग्णालयात दाखल, संजय राऊत यांची घेणार भेट
  • 11.48 AM - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेरून निघाले
  • 11.43 AM - शिवसेना सत्तेत येणार - मनोहर जोशी, सत्तास्थापनेचा मार्ग लवकरच निघेल, असा विश्वासही व्यक्त केला
  • 11.22 AM - शरद पवार वायबी सेंटरमध्ये पोहोचले, राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते बैठकीस हजर
  • 10.57 AM - कोणाचे काहीही चुकले नाही, लवकरच सरकार स्थापन होईल - छगन भुजबळ
  • 10.36 AM - शरद पवार हे संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर लिलावती रूग्णातयातून वायबी सेंटरकडे रवाना,
  • 10.30 AM - शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला; सूचना प्रसारम मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आला अतिरिक्त प्रभार
  • 10.20 AM - काल (सोमवारीच) सोनिया गांधींनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देण्यास होकार - विजय वडेट्टीवार
  • 10. 24 AM - राष्ट्रवादीची बैठक - सुप्रिया सुळे वायबी चव्हाण सेंटर येथे दाखल
  • 10.17 AM - शरद पवार यांनी दिल्लीला फोन केला - विजय वडेट्टीवार, काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा होता... सोमवारी राज्यातील नेते-राष्ट्रीय नेते चर्चा, कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवून पुढची दिशा ठरवू, आमची तयारी आहे, हायकमांडची तयारी आहे... दोन्ही पक्ष शिवसेनेसोबत चर्चा करू
  • 10.08 AM - शरद पवार लिलावती रूग्णालयात दाखल, सोबत रोहित पवारही
  • 09.54 AM - काँग्रेसचे नेते मुंबईत आल्यावर चर्चा करणार आणि मग निर्णय घेऊ - अजित पवार
  • 09.51 AM - शरद पवार सिल्वर ओक वरून लिलावतीकडे रवाना, रूग्णालयात संजय राऊत यांची घेणार भेट
  • 09.49 AM - काँग्रेस-राष्ट्रवादी आम्ही सोबत लढलो - अजित पवार, सत्तास्थापनेबाबत सोबत निर्णय घेणार, काँग्रेसचे पत्र उशिरा आले, काँग्रेसच्या पत्राची आम्ही वाट पाहत होतो... आम्हाला जनादेश विरोधी पक्षात बसण्याचा, मात्र, भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही... यानंतर शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली म्हणून ही परिस्थिती
  • 09.48 AM - मला माहिती नाही... - शरद पवार, सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी-काँग्रेसच्या बैठकीवर दिले स्ष्टीकरण
  • 09.40 AM - राष्ट्रवादीची बैठक - अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार सिल्वर ओकवर बैठकीसाठी पोहोचले..
  • 09.19 AM - '...कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।' - संजय राऊत यांचे रूग्णालयातून ट्विट
  • 08.30 AM - काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची बैठक रद्द... राज्यात राष्ट्रपती राजवटीकडे
  • 07.30 AM - आज ११ वाजता राष्ट्रवादीची वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक
  • 07.07 AM - आजच्या घडामोडी, दिल्लीत सोनिया गांधींची ११ वाजता कांग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक होणार... यानंतर काँग्रेस नेते घेणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट, यानंतर कांग्रेस-राष्ट्रवादी संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या भेटीला लीलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. काल (सोमवारी) संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेदेखील आहेत. तर थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राऊत यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांची लीलावती रूग्णालयात भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वायबी सेंटर येथे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वायबी चव्हाण सेंटर येथे होत आहे. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, आदी नेते उपस्थित आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा आहे. किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्राम) ठरवून पुढची दिशा ठरवणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्ष शिवसेनेसोबत चर्चा करू असेही ते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार लिलावती रूग्णालयाकडे रवाना झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना काल (सोमवारी) लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार हे लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

केंद्रातील काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आजची बैठक रद्द करण्यात आली असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. यामुळे सत्तास्थापनेचा जो तिढा सुरू आहे त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर त्यांना सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंतची वेळी दिली होती. त्यानुसार शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. मात्र शिवसेनेकडे बहुमतासाठीच्या १४५ आमदारांचे पत्र नव्हते. त्यामुळे त्यांनी पक्षाला थोडा वेळ वाढवून देण्याची मागणी केली. मात्र शिवसेनेच्या या मागणीला राज्यपाल कोश्यारी यांनी नकार दिला. त्याचवेळी शिवसेनेचा सत्तास्थापन करण्याचा दावा राज्यपालांनी स्वीकारलाही नाही आणि फेटाळलेलाही नाही. आता राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पाचारण केले आहे. त्यांना रात्री ८.३० पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

सोमवारी दिवसभर घडलेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले सत्तास्थापनेसाठीचे निमंत्रण हे दोन्ही काँग्रेससाठी महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र दोन्ही काँग्रेसकडे बहुमताचा आकडा नाही, तेव्हा ते आता नेमके काय करतात, शिवसेना त्यांना पाठिंबा देणार का, की परत आपल्या जुन्या मित्राकडे अर्थात भाजपकडे वळणार, की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

असे आहे पक्षीय बलाबल -

भाजप 105
शिवसेना 56
राष्ट्रवादी काँग्रेस 54
काँग्रेस 44
मनसे 1
सीपीआय (एम) 1
एआयएमआयएम 2
समाजवादी पक्ष 2
अन्य 23
एकूण 288
Last Updated : Nov 12, 2019, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details