मुंबई :आईने खेळण्यास बाहेर न जाऊ दिल्याने नऊ वर्षाच्या बालकाने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात कॉल करून जय अंबे चाळीत बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. या कॉलमुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. मंगळवारी दुपारी हा कॉल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरवून कॉल केलेल्या नऊ वर्षाच्या बालकाची माहिती काढली.
जय अंबे चाळीमध्ये ठेवला बॉम्ब :मंगळवारी दुपारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात फोन आला होता. फोन करणाऱ्या बालकाने जय अंबे चाळीमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले. या कॉलची माहिती तात्काळ गुन्हे शाखेला देण्यात आली. गुन्हे शाखेने फोन करणार्या बालकाचा तांत्रिक माहिती काढून शोध घेतला. यावेळी फोन करणारा नऊ वर्षांचा बालक असल्याचे निष्पन्न झाले. बालकाने दिलेली धमकी कशासाठी होती, याचे कारण कळाल्याने पोलिसांनी बालकाच्या पालकांना समजावून सांगितले. बालक अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथांना ठार मारण्याची धमकी :मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षात देखील अज्ञात कॉलरने कॉल करून धमकी दिली होती. यावेळी कॉलरने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे टार्गेटवर असून त्यांची हत्या करणार असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली. मुंबईत बॉम्ब आणि एके 47 पोचले असून 26 /11 सारखा दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी त्याने दिली होती. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मुंबई नियंत्रण कक्षास आणि वाहतूक नियंत्रण कक्षास हे धमकीचे लागोपाठ कॉल आल्यानंतर मंगळवारी दुपारी बालकाने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात कॉल करून पोलिसांची तारांबळ उडवली. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन येण्याचे सत्र सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा -
- Threats to Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ टार्गेटवर; मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याचा मुंबई पोलिसांना धमकीचा फोन
- Mumbai Police Threat Call : मुंबईसह पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणणार; मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन