मुंबई - मुंबईला गेले चार दिवस पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यात ३ दिवसात समुद्राला मोठी भरती आली नव्हती. मात्र, सोमवारी सकाळी समुद्राला मोठी भरती आली होती. आता २ ते ७ जुलैपर्यंत पुढील सहा दिवस सलग तसेच ३१ जुलैला ४.७९ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यामुळे समुद्र किनारी नागरिकांनी आणि पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
जून महिना संपता-संपता पडलेल्या पावसादरम्यान, तीन दिवस समुद्राला भरती होती. या भरतीच्या वेळेत जर जोरदार पाऊस पडला असता तर मुंबईत पाणी साचले असते. मात्र, तो धोका टळला आहे. मात्र, आता जुलै महिन्यातील पुढील सात दिवस धोक्याचे असणार आहेत. ५ जुलैला दुपारी २.०६ वाजता समुद्राला मोठी भरती असून त्यावेळी ४.७९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत २२ दिवस समुद्रात मोठी भरती असून किमान ४.५१ मिटर ते ४.९१ मिटर एवढ्या उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत.
ऑगस्ट महिन्यात १ ते ५ आणि २९ ते ३१, सप्टेंबर महिन्यात १ ते ३, आणि २७, ३० या तारखांना समुद्रात किमान ४.५१ मिटर ते ४.९१ मिटर एवढ्या उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता या शहरात जोरदार पाऊस पडत असेल व त्याच वेळी समुद्रात मोठी भरती असेल आणि ४.५० मिटर उंचीपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळत असतील तर मुंबईत सखल भागात पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. कारण, त्यावेळी समुद्रात सांडपाणी सोडण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लड गेट्स बंद ठेवण्यात येतात. परिणामी मुंबईत सखल भागात पाणी साचते. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जुलै महिना समुद्रात ७ दिवस मोठी भरती
दिनांक वेळ लाटांची उंची ( मीटर)
२ जुलै ११.५२ वा. ४.५४ मि., ३ जुलै १२.३५ वा. ४.६९ मि., ४ जुलै १३.२० वा. ४.७८ मि., ५ जुलै १४.०६ वा. ४.७९ मि., ६ जुलै १४.५२ वा. ४.७४ मि., ७ जुलै १५.४१ वा. ४.६० मि., ३१ जुलै ११.३१ वा. ४.५३ मि.