महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई: हायटेक एसी लोकल भर उन्हाळ्यात थंडावली - हायटेक एसी लोकल मुंबई बातमी

सर्वप्रथम मध्य रेल्वेने ३० जानेवारी २०२० पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली होती. त्या एसी लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. तरीसुद्धा मध्य रेल्वेने १७ डिसेंबर २०२० पासून एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मध्य रेल्वेच्या अंगलट आल्याचं दिसून येत आहे.

मुंबई रेल
मुंबई रेल

By

Published : Mar 24, 2021, 9:01 PM IST

मुंबई -भर कोरोना काळात आवश्यकता नसताना सुद्धा मध्य रेल्वे प्रशासनाने दुसरी एसी लोकल सुरु करण्याचा घाट घातला. मात्र, तेव्हापासूनच लोकल सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे. मात्र तरीही एसी लोकलमध्ये प्रवासी दिसून येत नाही. या महिन्यात फक्त १५ हजार ८६१ प्रवाशांने प्रवास केला आहे. त्यामुळे अगोदरच कोरोनामुळे रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशात एसी लोकल सुरु करणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना झाल्याचे बोलले जात आहे.

रेल्वेची डोकेदुखी वाढली
पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेने आपल्या मार्गांवर एसी लोकल चालविण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम मध्य रेल्वेने ३० जानेवारी २०२० पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली होती. त्या एसी लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. तरीसुद्धा मध्य रेल्वेने १७ डिसेंबर २०२० पासून एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मध्य रेल्वेच्या अंगलट आल्याचं दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात ४ हजार ३२, जानेवारीत १४ हजार ५४, फेब्रुवारीत १८ हजार ५ आणि मार्च महिन्यात १५ हजार ८६१ एसी लोकलमधून प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. त्यामुळे चालविण्यासाठी लागणार सुद्धा खर्च निघत नाही आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे.

एसी लोकल खासगी कंपनीच्या हाती ?
भारतीय रेल्वे सध्या खासगीकरणाचा सपाट सुरू असून शेकडो गाड्या खाजगी तत्त्वावर चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेकडून घेण्यात आलेला आहे. आता त्याच धर्तीवर मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकल देखील खासगी हातात देण्याची योजना सुरू आहे. काही कालावधीत ही योजना अमलात आणली जाणार आहे. एसी लोकल नाॅन पीक अव्हरमध्ये चालवून तोट्यात दाखवायची. त्यानंतर या लोकलचे खासगीकरण करून पीक अव्हरमध्ये चालविण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

आम्हाला एसी लोकल नकोत
एसी लोकलसाठी सामान्य लोकलच्या १० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. एसी लोकलचे भरमसाट तिकिट मुंबईकरांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यातच सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द केल्याने इतर गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे मुंंबईकरांनी आम्हाला एसी लोकल नको, लोकल प्रवासाची परवानगी द्या, अशी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा-लॉकडाऊनची वर्षपूर्ती : वर्षभराचा काळ सर्वांसाठीच ठरला कसोटीचा

ABOUT THE AUTHOR

...view details