मुंबई Mumbai Fire News :ऐन दिवाळीच्या दिवसात मुंबईतील आगीच्या घटना वाढत असून शुक्रवारी सायंकाळी (10 नोव्हेंबर) मुंबईतील विले पार्ले परिसरात असलेल्या न्यू पूनमबाग या इमारतीला लागलेल्या आगीत 96 वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. हर्षदा बेन पाठक असं या आगीत मृत्यू झालेल्या वृद्धेचं नाव आहे. या सोबतच मालमत्तेचं सुद्धा फार मोठं नुकसान झालंय. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.
वृद्धेचा आगीत होरपळून मृत्यू :मुंबई, विलेपार्ले पूर्व इथल्या नेहरू रोडवर असलेल्या न्यू पूनमबाग या बारा मजल्यांच्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर शुक्रवारी रात्री मोठी आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दुसऱ्या मजल्यावरील 201 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये ही आग लागली होती. सुदैवानं ही आग इतरत्र पसरली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचल्यावर एक ते दीड तासांमध्ये या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त केलं. मात्र या आगीमध्ये हर्षदा बेन पाठक या 96 वर्षीय वृद्धेचा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलंय.
मालमत्तेचं फार मोठं नुकसान :जेव्हा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा, त्यांना हर्षदा बेन पाठक, या घरात पडलेल्या असल्याचं दिसून आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना तातडीनं कूपर रुग्णालयामध्ये दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, या आगीमध्ये घरातील सामानाचं सुद्धा मोठं नुकसान झालं असून टीव्ही, फ्रीज, लाकडी फर्निचर, फॉल सीलिंग, लाकडी दरवाजे, इलेक्ट्रिक वायरिंग, घरगुती वस्तू या सर्व आगीत जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, आग पूर्णतः आटोक्यात आली असली, तरी ती आग कशामुळं लागली याचा तपास अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस करत आहेत.