मुंबई : मुंबईच्या विस्तारासाठी जितक्या नैसर्गिक मर्यादा आहेत, तितकीच आव्हाने देखील आहेत. दाटीवाटीच्या वस्तीत असलेली लोकसंख्या, वाढत्या गगनचुंबी इमारती, रासायनिक प्रक्रिया करणारे उदयोग-व्यवसाय यामुळे मुंबईत अनेकदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. मात्र अशा आव्हानांनाही तोंड देण्यासाठी मुंबई अग्निशमन दल सदैव सज्ज आहे. येत्या काळातही अत्याधुनिक यंत्रणा, साहित्य आणि उपकरणांसह मुंबई अग्निशमन दल अधिक सक्षमपणे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सुसज्ज असेल, अशी ग्वाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिली.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन :१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात 'एस. एस. फोर्ट स्टिकीन' या बोटीमधील दारूगोळ्याच्या साठ्याने पेट घेतला. त्यानंतर उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविताना मुंबई अग्निशमन दलातील एकूण ६६ अधिकारी, जवानांना वीरगती प्राप्त झाली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन पाळला जातो. त्या अनुषंगाने भायखळा येथील मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात आज आयोजित अग्निशमन सेवा दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यात, मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने सेवा बजावताना आजवर शहीद सर्व अधिकारी आणि जवानांना श्रद़धांजली अर्पण करण्यात आली. तसेच दिनांक १४ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत राबवण्यात येणाऱया अग्निशमन सेवा सप्ताहाचा प्रारंभ देखील झाला. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक एस. एस. वारीक, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांच्यासह अग्निशमन दलाचे सेवानिवृत्त अधिकारी व इतर मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आश्विनी भिडे बोलत होत्या.
अग्निशमन दल सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न :अग्नि सुरक्षेबाबत जनजागृती देखील तितकीच महत्त्वाची आहे. कारण जोपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय आपण करीत नाही तोपर्यंत आग दुर्घटनेचा धोका कायम राहणार आहे. आपल्या जवानांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आणि जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अग्निसुरक्षादेखील कशाप्रकारे जलद करू शकतो, याचाही विचार करायला हवा. त्यादृष्टीने अग्निशमन दल तांत्रिकदृष्टया अधिकाधिक सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करूया. यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून उंच इमारतींमध्ये लावलेली उपकरणे, यंत्रणा योग्यप्रकारे काम करीत आहे किंवा नाही हे तपासता येवू शकते. केंद्र शासनाच्या योजना, १५ व्या वित्त आयोगातूनही त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्विनी भिडे यांनी सांगितले.