मुंबई : वांद्रे येथे एक महिला समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची घटना ताजी असताना मालाडच्या मार्वे बीचवर मुले समुद्रात बुडाल्याची घटना घडली होती. मालवणी भागातील परेरा वाडी येथील रहिवासी असलेल्या 12 ते 16 वयोगटातील पाच मुले रविवारी सकाळी नऊ वाजता मालाड उपनगरातील मार्वे बीचवर पोहण्यासाठी गेले होते. समुद्राची खोली लक्षात न आल्यामुळे हे मुले समुद्रात बुडाले होते. मुंबईतील मार्वे बीचवर बुडालेल्या तीनही अल्पवयीन मुलांचे मृतदेह सोमवारी सापडले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
औपचारिकतेनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात : अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस, तटरक्षक दल आणि नौदलाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली होती. ती शोध मोहिम रविवारी रात्री थांबवण्यात आली होती. या शोध मोहिमेत हेलिकॉप्टरचाही सहभाग होता, तो संध्याकाळी मागे घेण्यात आला. बेपत्ता झालेल्या तीन मुलांचे मृतदेह शोधण्यात आज यश आले आहे. हे मुले वयोगटातील 12 ते 14 वयोगटातील होते. या मुलांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, असे मालवणी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. योग्य औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.