मुंबई - कोरोना लॉकडाऊन दरम्यान आलेले अनेक सण घरच्याघरी साधेपणाने साजरे करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावर्षी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन होणार नाही. ढोल-ताशा वाजवता येणार नाही याचे दुःख आहे. मात्र, पुढील वर्षी दुप्पट जोशात बाप्पांचे आगमन करू, अशी भावना ढोल-ताशा पथकांनी व्यक्त केली आहे.
बाप्पाचे आगमन होण्याअगोदर मुंबईत असणाऱ्या उड्डाणपुलांखाली मैदानात ढोल-ताशांचा कडकडाटासह पथकांच्या सराव तालमी चालतात. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ढोल-ताशा पथकांचे आवाज मुंबईत घुमणार नाहीत. यामुळे पथकातील वादक नाराज आहेत. मात्र, सध्या नागरिकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे पथकांनीही गणेश मंडळांना साजेशी भूमिका घेत वादन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
ढोल-ताशा पथकांची सुरुवात पुण्यापासून झाली. त्यापूर्वीचा विचार केला तर काही ठिकाणी सणासुदीला ढोल-ताशा आणि इतरही काही वाद्ये वाजवली जात होती. मात्र, वेगळ्या प्रकारचे सादरीकरण आणि रुबाबदार ढोलपथकांमुळे गणेश मिरवणुकींकडे तरुणाईची गर्दी वाढू लागली. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली यासारख्या ठिकाणी एकामागून एक ढोल-ताशा पथके तयार होऊ लागली. शिवजयंती, गुढीपाडवा, गणेशोत्सव या सणांच्या दिवशी ढोलपथकांना सर्वाधिक मागणी असते. मुख्य वादनाच्या काही महिने आधीपासूनच या पथकांच्या सरावाला सुरुवात होते.