नारायण राणेंच्या वक्तव्याचे समर्थन नाही, पण भाजप त्यांच्या पाठीशी - देवेंद्र फडणवीस
वस्तुत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विसरतात, यामुळे कोणाच्या मनामध्ये संताप व्यक्त होऊ शकतो. मात्र, तो वेगळ्या पद्दतीने व्यक्त करू. कारण एखाद्याने वासरू मारलं म्हणून आम्ही गाय मारणार नाही.
देवेंद्र फडणवीस
By
Published : Aug 24, 2021, 1:39 PM IST
|
Updated : Aug 24, 2021, 3:21 PM IST
मुंबई -नारायण राणे यांनी बोलण्याच्या भरात मुख्यमंत्र्यांबाबत बोलले असतील. मात्र, तसं वाक्य वापरण्याचं त्यांच्या मनात असेल, असं मला वाटत नाही. मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद आहे. त्या पदाबद्दल बोलताना संयम बाळगणं, असं आमचं मत आहे. मात्र, त्याच्यावर सरकार आता ज्याप्रकारे कारवाई करतंय हे समर्थनीय नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांबद्दल संताप स्वाभाविक -
वस्तुत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विसरतात, यामुळे कोणाच्या मनामध्ये संताप व्यक्त होऊ शकतो. मात्र, तो वेगळ्या पद्धतीन व्यक्त करता आला असता. कारण एखाद्याने वासरू मारलं म्हणून आम्ही गाय मारणार नाही. भारतीय जनता पक्ष नारायण राणेंच्या पाठीशी आहे. ज्याप्रकारे पोलिसांनी कारवाई केली आहे, याबाबत मला आश्चर्य वाटतं. शर्जील उस्मानी महाराष्ट्रात येतो, त्याच्यावर कारवाई होत नाही. त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाही. मात्र, याठिकाणी पूर्ण पोलीस दल नारायण राणेंना ताब्यात घेण्यासाठी कारवाई करत आहे.
तसेच नारायण राणेंनी केलेले वक्तव्य हा दखलपात्र गुन्हा नाही. मात्र, त्याला ऑफेन्समध्ये जबरदस्तीने covert करायचा प्रकार सुरू आहे.
काय म्हणाले होते राणे ?
'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
पोलीसजीवी सरकार -
महाराष्ट्राच्या पोलिसांबाबत मला आदर आहे. मी त्यांच्यासोबत पाच वर्ष काम केलंय. निष्पक्ष पोलीस दल म्हणून त्याची ख्याती आहे. मात्र, कायदा जिथे योग्य असेल तिथे कारवाई केलीच पाहिजे. सरकारला खूश करण्यासाठी पोलीस दल कारवाई करत असेल, तर ते योग्य नाही. आधीच खंडणी प्रकरणामुळे महाराष्ट्र पोलीस दलाकडे पाहण्याची लोकांची नजर बदलली आहे. आता पोलीसजीवी सरकार झालंय, असं मला वाटतं. कंगना, अर्णवबाबत सर्वोच्च न्यायालय सरकारला चपराक बसवत आहे. मात्र, यानंतर पोलिसांना आपला बदला घेण्यासाठी समोर करायचं, हे योग्य नाही.
भाजप पूर्णपणे राणेंच्या पाठीशी -
मी धमकी नाही तर सल्ला देतो की, कायद्याने काम करा. कारण बेकायदेशीर पणे काम करणारे पोलीस आता कुठे आहेत हे मला सांगण्याची गरज नाही. राणेंच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही. मात्र, ज्याप्रकारे सरकार पोलिसांचा वापर करत आहे, त्यावरुन भाजप पूर्णपणे राणेंच्या पाठीशी आहेत.
आम्ही हिंसा करत नाही. भाजप कार्यालयावर जर कोणी हल्ला केला तर ते खपवून घेतले जाणार नाही. कायद्याचं राज्य असलं पाहिजे. यामुळे एकूणच ज्याप्रकारे पोलिसांचा गैरवापर चालला आहे, हे योग्य नाहीये आणि अवैधपणे पोलिसांनी अटक केली तर जनआशिर्वाद यात्रा थांबणार नाही. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनते प्रवीण दरेकर, भाजप नेते रविंद्र चव्हाण आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरू राहील. पोलिसांच्या भरवशावर भाजपला रोकण्याचा प्रयत्न 50 वर्षे झाला. मात्र, भाजप थांबले नाही.
पोलिसांची कारवाई अयोग्य -
माझा सरकारला स्पष्टपणे सल्ला आहे, की अशा गोष्टी लोकशाहीमध्ये योग्य नाही. तुम्ही केंद्रीय नेत्यांना निर्लज्ज म्हणता, लाथा घाला म्हणता, त्यावर गुन्हा दाखल का होत नाही, असा सवालही त्यांनी केला. अशी दुटप्पी भूमिका घेऊ नका, असेही ते म्हणाले. तसेच पोलिसांकडून जी कारवाई करण्यात येत आहे, ती अयोग्य आहे, असे स्पष्टपणे त्यांनी यावेळी सांगितले.