मुंबई :विकेश हा तरुण दिवा येथे त्याच्या आई-वडिल आणि भावासोबत राहतो. अलीकडेच त्याचा प्रेमभंग झाला होता. त्यातून त्याने एका तरुणीचा विनयभंग करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच, विकेशविरुद्ध सहार पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम ३५४, ३५४ (अ), ५०९, ५००, ५०६ सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अन्वये गुन्हा नोंदविला होता. हा तरुण मानसिक तणावात होता.
आरोपीच्या अटकेचे आदेश : तक्रारीची सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांनी गंभीर दखल घेतलीय. त्यांनी आरोपीच्या अटकेचे आदेश गुन्हे पथकाला दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना तक्रारदाराच्या नातेवाईकांना विकेशने एक मेसेज पाठविला होता. त्यात त्याने प्रेमभंग झाल्याने तो मानसिक तणावात असल्याचं म्हटले. म्हणून तो लोकलखाली आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं होतं. हा मेसेज पोलिसांना नातेवाईकांकडून मिळताच पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे, एपीआय कोळी, उपनिरीक्षक संजय कल्हाटकर, भूषण जाधव, अंमलदार विशाल जाधव, महेश गायकवाड, रवी पेंढारी, सागर गायकवाड यांचे तीन विशेष पथक विविध ठिकाणी रवाना झाले होते.
विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक : तपासादरम्यान विकेश हा 'सीएसएमटी ते दिवा' असा लोकलनं प्रवास करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. यातील एक पथक दिवा येथे पाठविण्यात आलं होतं. त्याचा शोध सुरु असतानाच पोलिसांना एक तरुण आत्महत्येच्या तयारीत असल्याचं दिसून आलं. यावेळी विकेशला उपनिरीक्षक संजय कल्हाटकर, अंमलदार विशाल जाधव आणि महेश गायकवाड यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत 'तोच' विकेश असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. ही माहिती नंतर त्याच्या भावासह आई-वडिलांना देण्यात आली होती. त्यांच्यासमोरच त्याचं समुपदेशन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला सकाळी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली.