मुंबई Mumbai Crime News : कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अटकेत असलेला आरोपी कॉक्स अॅन्ड किंग्सचा प्रमोटर अजय अजित पीटर केरकर बॉम्बे रुग्णालयात मोबाईल आणि टॅबचा वापर करत असल्याचं उघडकीस आलंय. याप्रकरणी आर्थर रोड तुरुंग प्रशासनानं दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घटलं :आरोपी केरकरला मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने 2020 मध्ये अटक केली होती. अटकेनंतर आर्थर रोड कारागृहात असताना न्यायालयीन आदेशावरून केरकरला उपचारसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार महिन्यांपासून केरकरवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एलए पोलीस दलाचे दोन पोलीस अजय केरकरच्या सुरक्षेसाठी बॉम्बे रुग्णालयात असताना तो मोबाईल आणि टॅब वापरत असल्याचं आर्थर रोड कारागृह प्रशासनाच्या अचानक टाकलेल्या छाप्यामध्ये उघडकीस आलं. त्यानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.