मुंबई Mumbai Crime News : मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी 2 बिहारच्या ड्रग्ज तस्करांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 8 लाख रुपये किमतीचं 505 ग्रॅम चरस जप्त केलं आहे. दीपक अक्षयबरनाथ सिंह आणि असगर अली अमीन हुसैन अंसारी, असं अटक करण्यात आरोपींची नावं आहेत. दरम्यान, या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
दोन बिहारी तस्करांच्या आवळल्या मुसक्या : एक्सर मेट्रो स्टेशनजवळ एक आरोपी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती एमएचबी पोलिसांना आपल्या सुत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर दीपक अक्षयबरनाथ सिंह नामक ड्रग्ज तस्कराला एमएचबी पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी आरोपीकडून 8 लाख रुपये किमतीचे 505 ग्रॅम चरस जप्त करण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणी दीपक सिंहची कसून चौकशी करण्यात आली असता, त्यानं असगर अली अमीन हुसैन अंसारी या ड्रग्ज तस्कराची माहिती पोलिसांना दिली. तसंच बिहार इथून असगर अलीकडून आतापर्यंत तीन-चार वेळेस अर्धा-अर्धा किलो चरस आणल्याचंही त्यानं सांगितलं. त्यानंतर असगर अली अमीन हुसैन अंसारी याला बिहारमधील लकड़ी नबीगंज ओपी इथून अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपींनी 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं असता, त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आली आहे.