मुंबईMumbai Crime News :परळच्या आर्यभट्ट गार्डनमध्ये एक 17 वर्षांचा मुलगा 15 वर्षांच्या मुलीसोबत बसला होता. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि त्यांनी वकील असल्याचं सांगून मुला-मुलीकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. या तिघांनी त्यांना धमकावत पैसे न दिल्यास दोघांनाही तुरुंगात टाकू, असं सांगितलं होतं. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी वकील असलेल्या आरोपी आकाश आढाव (Akash Adhav) याला (lawyer Arrested) अटक केली आहे. आकाशाची पत्नी साक्षी आणि शिवाजी वायरकर यांना देखील जेरबंद केलं आहे, असं भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा पीडित मुलाचा मोठा भाऊ आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याच्या लहान भावाचे कॉलेज सायंकाळी 5.30 वाजता सुटते आणि तो संध्याकाळी 6 वाजता घरी येतो. मात्र तो सोमवारी सायंकाळी 6.40 वाजेपर्यंत घरी आला नाही. 17 वर्षीय मुलगा वेळेवर घरी आला नाही तेव्हा त्याच्या थोरल्या भावाने त्याला फोन केला पण त्याने उचलला नाही. काही वेळाने तक्रारदाराला त्याच्या भावाच्या मोबाईलवरून फोन आला आणि फोन करणाऱ्याने आपले नाव आकाश आढाव असून तो वकील असल्याचं सांगितलं. तुझा भाऊ एका लहान मुलीसोबत असल्याचं आढाव यांनी सांगितलं. पोलिस व्हॅन येतेय, सांग काय करू? यानंतर तक्रारदार त्याच्या आईसह आर्यभट्ट गार्डनमध्ये पोहोचला. तेथे त्याचा भाऊ, मुलगी आणि एक पुरुष आणि दोन महिला असे तीन लोक होते. हे तिघेही वकील असल्याचं सांगितलं.
प्रत्येकी १५ हजार रुपये मागितले : तुमचा भाऊ बागेत एका लहान मुलीसोबत सापडला आहे. आम्ही त्याला पोलिस ठाण्यात नेऊन त्याच्यावर कारवाई करू,असं त्या व्यक्तीनं तक्रारदार भावाला सांगितलं. त्या तिघांमध्ये एक माणूस होता. त्याने त्याचे नाव आकाश आढाव सांगितलं आणि त्याच्या वकिलाचे कार्ड दाखवलं. तुझ्या भावाला आणि मुलीला वाचवायचं असेल तर प्रत्येकी १५ हजार रुपये द्यावे लागतील, असं आढाव यांनी फिर्यादीला सांगितलं. तक्रारदाराने आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगताच आढाव यानं त्याच्याकडे आठ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने पैसे देऊ शकत नसल्याचं सांगितलं.
तिघांनाची केली चौकशी : आकाश आढावच्या धमकीला घाबरून तक्रारदाराच्या धाकट्या भावाने, पेटीएमद्वारे आढाव यांना १५०० रुपये दिले. आढाव १५०० रुपयांवर सहमत नसल्यानं त्याने पुन्हा धमकी देत उद्या आठ हजार रुपये घेऊन ये, असं सांगितलं. त्याचवेळी भोईवाडा पोलिसांची व्हॅन तेथे आली आणि त्यांनी सर्वांना पोलिस ठाण्यात नेलं. तिघांनाही पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता आकाश चंद्रकांत आढाव (२६) असं वकील असलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो शिवडी येथील शिवसागर इमारतीत राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. साक्षी आकाश आढाव (वय 23) आणि शिवाजी संदीप वायरकर (वय 21) अशी त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींची नावे आहेत. वायरकर हे चारबाग रोड, परळ येथे राहतो. भोईवाडा पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, आकाश आणि साक्षी हे पती-पत्नी आहेत.