मुंबई :चालत्या लोकलमध्ये एका १९ वर्षांच्या तरुणीशी अश्लील चाळे करुन तिचा नराधमानं विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्थानकादरम्यान घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणास अंधेरी रेल्वे स्थानकावरुन अटक केली आहे.
आरोपी मूळ बिहारचा : भरत बहादूर पंडित (वय 26 वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो मूळचा बिहारच्या मधुबनीचा रहिवासी आहे. हा तरुण सध्या विलेपार्ले परिसरात राहतो, असं सहायक पोलीस आयुक्त बाजीराव महाजन यांनी सांगितलं. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं.
चालत्या लोकलमध्ये विनयभंगाचा प्रयत्न : तक्रारदार तरुणी वसई येथील रहिवासी आहे. बुधवारी सकाळी पावणेअकरा वाजता ती विलेपार्ले-अंधेरी लोकलनं प्रवास करत होती. दरम्यान, मागे उभा असलेल्या एका तरुणानं अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिनं याकडं दुर्लक्ष केलं. मात्र, अंधेरी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यानं पुन्हा तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथं उपस्थित असलेल्या निर्भया पथकाच्या महिला पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी तरुणीकडं याबाबत विचारपूस केली असता तिनं तिच्यासोबत घडललेला सर्व प्रकार सांगितला.