मुंबई - कोरोना विषाणूचे थैमान सुरू असून संसर्ग वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. रोजची मुंबईतील रुग्णाची आकडेवारी राज्यातील आकडेवारीच्या अधिक येत आहे. शहरातील अनेक हॉटस्पॉट ठिकाणांना पालिकेने व पोलिसांनी सील केले आहे. भाजी व इतर आस्थापना सुरू करण्यास मनाई असताही मानखुर्द, शिवाजी नगर गोवंडीत अनधिकृत हातगाड्या व लाकडी बाकडे टाकून भाजी विक्री करणाऱ्यावर आज पालिकेने कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले आहे.
मानखुर्द, शिवाजीनगरात अनधिकृत फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर पालिकेची धडक कारवाई
भाजी व इतर आस्थापना सुरू करण्यास मनाई असताही मानखुर्द, शिवाजी नगर गोवंडीत अनधिकृत हातगाड्या व लाकडी बाकडे टाकून भाजी विक्री करणाऱ्यावर आज पालिकेने कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले आहे.
उपनगरातील मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी परिसरात मोठ्या संख्येने कोव्हिड-19 चे रुग्ण आढळत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्स पाळत नसल्याने पालिकेने भाजी मार्केट बंद केले आहेत, तर काही गल्ली बोळात हातगाड्यावर भाजी पाला विक्रेते बसत होते त्या गाड्यावर नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याने शिवाजीनगर-बैंगणवाडी, कमला रमण नगर, गौतम नगर, टाटांगर, लल्लूभाई कॉम्प, पीएमजीपी कॉलनी, मंडळा, चिता कॅम्प, म्हाडा वसाहत, भारत नगर, वाशी नाका या ठिकाणी पालिकेने कारवाई करीत 233 हातगाड्या व 113 लाकडी बाकडे जप्त केल्याने अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. काही दिवसांपूर्वी मानखुर्दच्या ललूभाई वसाहतीत पालिका पथक हातगाडीवर कारवाई करण्यासाठी गेले असता फेरीवाल्यांनी पोलिसांवरच हात उगारला होता.