मुंबई -शहराचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त परमवीर सिंह मराठी भाषेचा वापर करत नाहीत, याबद्दल मराठी एकीकरण समिती संघटनेचे उपाध्यक्ष आंनदा पाटील आणि सहकारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून परमवीर सिंह यांची २९ फेब्रुवारी २०२० रोजी नियुक्ती झाली. यांनतर त्यांनी अधिभार स्विकारल्यावर पोलीस मुख्यालयात पहिल्यांदा पत्रकार परिषदे घेतली असता, मराठीत संवाद न साधता, हिंदी भाषेत साधला होता. त्यावेळी ते मराठीत का बोलले नाहीत, असा सवाल करणारे व्हिडिओ माध्यमांवर सर्वत्र पसरले होते. पोलीस विभागाला मराठी वापरण्याचे आदेश आणि तसेच नियम असताना ते पाळण्यात येत नाहीत. परमवीर सिंह हे ठाण्याचे आयुक्त असल्यापासून आम्ही मराठी वापरासंबंधी त्यांची तक्रार समिती करत आहे. मात्र, इतक्या वर्षात ते राज्यशासनाचे नियम पाळत नाहीत हे निदर्शनास येत आहे. मराठीचा नेहमी अवमान करत आले आहेत. त्यामुळे गृहमंत्री आणि मराठी भाषा विभागमंत्री यांनी याकडे लक्ष घालून मुंबईची, महाराष्ट्राची मराठी ओळख पुसू देऊ नये, यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती मराठी एकीकरण समितीने केली आहे.