मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा सुविधेसाठी एसटी महामंडळाने 2 हजार 211 बसेस सोडल्या आहेत. एसटी बसेस आणि रेल्वे गाड्यामार्फत लाखोंच्या संख्येत चाकरमान्यांनी गाव गाठले आहे. मात्र, आता कोकणाकडे जाताना चाकरमान्यांना रेल्वेचा भरमसाठगर्दीचा सामना करावा लागल्याने तीच समस्या मुंबईकडे परत येताना होऊ नयेत म्हणून, चाकरमान्यांनी एसटी बसेसना पसंती दिली. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत एसटीच्या 1 हजार 453 जादा गाड्यांचे आरक्षण हाऊस फुल्ल झाले आहे.
एसटीला पसंती -
दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता रेल्वे प्रशासानांकडून प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात येतात. गणेशोत्सवाचा 3 महिन्याआधीपासून सुरू असणाऱ्या तिकिट बुकिंग प्रक्रियेतही अनेकवेळा प्रवाशांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो. तसेच तिकिट काढूनही प्रतिक्षा यादीत नाव येत असल्याने प्रवाशांना गणेशोत्सवासाठी जाताना बराच त्रास सहन करावा लागतो. मात्र, परतीच्या प्रवासासाठी हे हाल होऊ नयेत, म्हणून मुंबईकडे परतताना चाकरमान्यांनी रेल्वेपेक्षा एसटी बसेसना पसंती दिली. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत एसटीच्या 1 हजार 453 जादा गाड्यांचे आरक्षण हाऊस फुल्ल झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.