मुंबई: मुंबईतील प्लॅस्टिकच्या अंदाधुंद वापराबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने आजपासून मुंबईत प्लास्टिक बंदी जाहीर केली असून, यासाठी पालिकेने पाच जणांची टीम तयार केली आहे. ही टीम प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणार आहे. मुंबईकरांच्या हातात ५० मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यास थेट ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. आतापर्यंत बीएमसी फक्त दुकानदारांवरच कारवाई करत होती, मात्र आता गणपती सणाआधी बीएमसी प्लास्टिक वापरणाऱ्या ग्राहकांवरही नजर ठेवणार आहे. पालिकेच्या या धडक मोहिमेची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडला असेल आणि तुमच्या हातात जर कॅरीबॅग असेल तर लोकहो तुम्हाला देखील पाच हजार रुपये दंड म्हणून भरावे लागू शकतात.
प्लास्टिकविरोधी कारवाई : प्लास्टिक कचऱ्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबत असल्याचे मुंबईत अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळेच आता प्लास्टिकविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. पावसाळ्यात अनेकदा गटाराचे मेन होल, गटाराच्या जाळ्या, छोट्या पाईप लाईन अशा अनेक ठिकाणी प्लास्टिक अडकते. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. हे प्लास्टिक काढण्यासाठी अनेकदा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून गटारात उतरावे लागते. 1 जुलै 2022 ते 31 जुलै 2023 पर्यंतच्या पालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 7,91,5000 दुकानदारांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ५२८३.७८२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.