मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत वाढत असलेल्या या रुग्णांची संख्या पाहून बृहन्मुंबई महानगरपालिकेने टेस्टिंगच्या अनुषंगाने एक नवी गाईडलाइन जारी केली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी याची ट्विट करुन माहिती दिली. यात त्यांनी, ज्या कोणाला कोरोना टेस्ट करावयाची आहे ते टेस्ट करु शकतात, टेस्टिंगसाठी आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसल्याचे म्हटलं आहे.
शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी, बीएमसी शहरात कोणत्याही व्यक्तीला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय टेस्टिंग करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लॅब आता कोणाच्याही मर्जीवर आयसीएमआरच्या नियमावलीनुसार आरटी पीसीआर परिक्षण करणार आहे. दरम्यान, या निर्णयाने शंका असणाऱ्या लोकांना चाचणी करता येणार आहे. याची सुरूवात आजपासून केली जाणार आहे.
दरम्यान, याआधी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार, खासगी डॉक्टरांनाही एखाद्या रुग्णाला कोरोना चाचणीसाठी पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांवर भर देण्याचा केंद्राचा निर्णय खऱ्या अर्थाने लागू होण्यासाठी मदत होणार आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांसोबत झालेल्या एका बैठकीनंतर केंद्राने हा निर्णय घेण्यात आला.