मुंबई : Mumbai Air Quality Index: राज्यात मान्सून सध्या परतीच्या मार्गावर आहे, तर काही ठिकाणी मान्सून पूर्णपणे गायब झाला आहे. सध्या ऑक्टोबर महिना सुरू असून दिवसभर वातावरणात कमालीची उकाडा जाणवत आहे. तसंच सध्या गुलाबी थंडी चाहूल देखील सर्वांनाच जाणवू लागली आहे. मात्र अशातच मुंबईतील हवेची गुणवत्ता कमालीची घसरलीय. गेल्या आठवड्यापासून मुंबईसह पश्चिम, मध्य उपनगरांमध्ये सकाळपासूनच धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यामुळं प्रदुषणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
हवेच्या प्रदूषणात वाढ :कल्याण, डोबिंवली, बदलापूर, अंबरनाथ, मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, ठाणे आदी शहरात हवेत धुक्याचे साम्राज्य पाहयला मिळतय. या धुक्यामुळं हवेच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळं आजार वाढण्याची शक्यता असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. पहाटे धुक्यामुळं वाहन चालताना अडचणीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. धूक्यातून वाट कशी काढायची? हा प्रश्न वाहन चालकांसमोर आहे. मुंबईत पावसाळ्यात हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत होती. मान्सूनच्या पुनरागमनानंतर वाऱ्यांचा वेग मंदावला असून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळं वाढत्या ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकरांना आरोग्याची काळजी घ्यावी लागत आहे.
हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण :देशातील काही महत्त्वाच्या शहरांच्या हवेच्या गुणवत्तेबाबत 2019 ते 2023 असा चार वर्षांचा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये ऑक्टोबर ते मार्च दरम्यान हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे दिसून आलं आहे. दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, लखऊ, पाटणा, मुंबई या मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढल्यानं हवा प्रदूषित होत असल्याचं दिसून आलं आहे. पावसाळ्यात कमी धूळ उडत असल्यानं मुंबईतील हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र ऑक्टोबरनंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत दिसून येते. दिल्ली, पाटणा येथेही हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण झाली आहे.
धुक्यामुळं अपघाताची शक्यता :हवेतील गुणवत्ता खालावली असल्याचं मुंबई महापालिका, प्रदूषण मंडळाकडून सांगण्यात आलंय. हवेतील गुणवत्ता निर्देशांक 200 ते 300 एक्युआहून अधिक आढळत आहे. तसेच धुक्यामुळं वातावरणात बदल जाणवत आहे. दिवसभर कमालीचा उकाडा, तर रात्री थंडावा जाणवत आहे. धुक्यामुळं वाहनचालकांना समोरचे काही दिसत नसल्यामुळं अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसंच या धुक्यामुळं आजारात वाढ होण्याची शक्यता असल्याचं आरोग्यतज्ञांनी म्हटलं आहे.