महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटीवर आगार अन् स्थानके गहाण ठेवण्याची वेळ; कर्ज काढून देणार कर्मचाऱ्यांचे वेतन - एसटी कर्मचारी वेतन न्यूज

दोन हजारांहून अधिक एसटी कर्मचारी कोरोनाबधित झाले असून आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतनही थकले आहे. त्यांना वेतन देण्यासाठी आता महामंडळाने एक मार्ग शोधून काढला आहे.

Anil Parab
अनिल परब

By

Published : Oct 30, 2020, 5:37 PM IST

Updated : Oct 30, 2020, 8:16 PM IST

मुंबई -कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूक बंद होती. याकाळात राज्य परिवहन महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला. कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतनही थकले आहेत. दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाला 2 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागणार आहे. त्यासाठी आगार आणि स्थानके बँकांकडे गहाण ठेवण्याचा विचार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

एसटीच्या मालमत्तेबाबत स्पष्टीकरण देताना अनिल परब

कर्मचाऱ्यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा -

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने काही दिवसांपूर्वी कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना एक महिन्याचे वेतन दिला आहे. शिल्लक राहिलेले वेतनही लवकरच देऊ असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही थकीत वेतन न मिळाल्याने एसटी कामगार संघटनांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत आपण परिवहन मंत्र्यांशी चर्चा करतो, असे आश्वासन शरद पवारांनी कामगार संघटनांना दिले होते.

महामंडळाला झाला आहे कोट्यधींचा तोटा -

कोरोनाचा प्रसार होत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता एसटी सेवा बंद होती. त्यामुळे एसटीला मिळणारे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले नाही. परिणामी एसटीचा संचित तोटाही वाढला आहे. हा संचित तोटा ५ हजार ५०० कोटी रुपयांचा आहे. संचित तोटा वाढल्यानंतर उत्पन्नाची साधने वाढली पाहिजे अन्यथा तोटा आणखी वाढत जातो. कोरोनामुळे उत्पन्नाची साधने वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झाले. त्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन थकले, परिवहन मंत्री परब यांनी सांगितले.

आगार आणि स्थानके बँकांकडे ठेवणार गहाण -

दिवाळी सण आल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देणे गरजेचे आहे. म्हणून परिवहन विभागाने सरकारकडे 3 हजार 600 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनामुळे राज्याचीही आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे आता परिवहन विभागानेच कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. २ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येईल. बँकांकडे एसटीची पत चांगली आहे. कर्जासाठी बँकांकडे एसटी आगार आणि स्थानके गहाण ठेवण्याचा एसटीचा विचार असल्याचे परब यांनी सांगितले. एसटीची ही मालमत्ता केवळ विशिष्ट काळासाठी त्यांच्या ताब्यात राहील. पैसे दिल्यानंतर आपली मालमत्ता सोडवण्यात येईल, असेही परब यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Oct 30, 2020, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details