मुंबई - महाविकास आघाडीची चौथी वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी येथे झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी आशिष शेलार यांच्यावरही नाव न घेता जोरदार प्रहार केला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत भाजप पक्ष फोडत आहे. तसेच यापुढे आम्ही सर्वजण एकत्रच असल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी सभेवेळी केला.
आशिष शेलारांना चिमटा - भाजप नेते आशिष शेलार यांनी वज्रमूठ सभेवरून महाविकास आघाडीवर टीका केली होती. मुंबईतील सर्वात लहान मैदानावर महाविकास आघाडीला सभा घेण्याची वेळ आली आहे, असे शेलार म्हणाले होते. यावर संजय राऊत यांनी शेलारांना चांगलेच फैलावर घेतले. तुमचे डोळे चिनी लोकांसारखे लहान आहेत. त्यामुळे बारीक दिसत असेल. येथे येऊन पाहा जमलेली गर्दी ही आमची ताकद असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
मुंबई आमच्या बापाची - महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळा करण्याचा डाव केंद्र सरकारचा सुरू आहे. हा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, जोपर्यंत शिवसेना महाराष्ट्रात आहे तोपर्यंत मुंबई मराठी माणसापासून कोणीही तोडू शकत नाही. तसेच यापुढेही मुंबई ही मराठी माणसाची आहे, मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मुंबई ही आमच्या बापाची आहे, असा इशाराच संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
काम की बात करा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाचे 100 एपिसोड पूर्ण केले. त्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला. मन की बात काय करताय, काम की बात करा, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच काम की बात न करणारे पंतप्रधान पहिल्यांदाच मी पाहिले असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई भेटीवरूनही संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
अजित पवार आमच्यासोबतच - विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मागील महिन्याभरापासून सुरू होत्या. मुंबईतील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अजित पवार हे हजर होते. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अजित पवार हे सर्वांच्या आकर्षणाचे विषय बनले होते. पण अजित पवार हे कुठेही जाणार नाहीत. अजित पवार हे आमच्यासोबत आहेत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.