मुंबई - मी पोकळ धमक्या देत नाही. मी शिवसैनिक आहे. मी अॅक्शनवाला माणूस असून मी नौटंक्या करत नाही. या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, असे संजय राऊत यांनी शिवसेना स्टाईल प्रत्युत्तर कंगनाला दिले आहे.
मी पोकळ धमक्या देत नाहीतर थेट अॅक्शन घेतो, संजय राऊतांचे कंगणाला शिवसेना स्टाईल प्रत्युत्तर भाजप नेते राम कदमांनी कंगणा रानौतची तुलना झाशीच्या राणीशी करणे हा सर्वात मोठा अपमान आहे. झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्सच्या गुळण्या टाकणारे कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल आणि राजकीय पक्ष अशा प्रकारे खऱ्या झाशीच्या राणीचा अपमान करणार असतील, तर या देशाचे राष्ट्रीयत्व काही लोकांनी किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय, अशी टीकाही संजय राऊतांना राम कदमांवर केली.
मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या प्रवृत्तींना जे पाठीशी घालतात त्या राजकीय पक्षांना मुंबईत, महाराष्ट्रात मते मागण्याचा अधिकार नाही. त्यांचे जे लोक मुंबईच्या मतांवर निवडून आले त्यांना पाकव्याप्त काश्मीरने मतदान केलं का? की, पाकड्यांनी मतदान केले? याचा खुलासा राजकीय पक्षाने करावा, असे राऊत यांनी भाजपला म्हटले आहे.
तुम्हाला लाज वाटली पाहिजे मुंबईला पाकिस्तान म्हणता. मुंबईचे पोलीस हे काय पाकिस्तानचे पोलीस आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे अतिरेकी, गुंडांचे हल्ले परतवून लावून रक्षण केले. या कोणीही व्यक्तीला मुंबईत राहून मीठ खाण्याचा अधिकार नाही, असे खडेबोल राऊतांनी कंगणाला सुनावले आहेत.
ही मुंबई 106 हुतात्मांनी मिळवली आहे. या मुंबईचे रक्षण आमच्या पोलिसांनी केले आहे. 26/11 हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला. कसाबला याच पोलिसांनी पकडले, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, असा हल्लाबोल राऊतांनी कंगणावर केला.
मी भाजप म्हणत नाही, कोणताही राजकीय पक्ष असू द्या. अशा व्यक्तींमागे राजकीय पाठबळ उभं करण्याच्या फंदात पडू नये; ते बुमराँग होते, अशी टीका भाजपवर राऊत यांनी केली. माझा कोणावर व्यक्तीगत राग, आकस नाही. कोणी महाराष्ट्रावर हल्ला करत असेल तर त्याबाबत प्रत्येक मराठी माणसाला व जे वर्षांनुवर्षे महाराष्ट्रात राहतात, त्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. आज या विषयात जे महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहिले त्यांचे मी स्वागत करतो आणि ते सर्व महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत, असेही राऊत म्हणाले.