मुंबई :खासदार संजय राऊत म्हणाले की, आमचे आमदार नितीन देशमुख यांनी पाणी प्रश्नावर आंदोलन केले. ते या सरकारविरोधात पाणी यात्रा काढत होते. याचा सरकारला त्रास का? जे पाण्यासंदर्भात प्रकल्प मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी सुरू केले होते, त्याला स्थगिती देण्याचे काम करण्यात आलेले आहे. त्यावेळी याच फडणवीसांनी याच पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मोर्चे काढले होते. आता सत्तेत आल्यावर फडणवीस ते सगळे विसरले. त्यांनी आमचे नितीन देशमुख यांना अटक करण्याचे आदेश दिलेत.
50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू :खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी हजारो श्री सेवक हे पाण्याशिवाय तडफडून गेले. मला तिथल्या स्थानिकांनी जी माहिती दिली, त्यानुसार 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकार आकडा लपवत आहे. पाण्याशिवाय हे सगळे बळी गेले. अशाच पाणी प्रश्नावर आवाज काढणाऱ्या नितीन देशमुख यांच्यावर जवळजवळ हल्ला करून त्यांना ताब्यात घेतले गेले. शांततेच्या मार्गाने ते निदर्शने करणार होते. फडणवीस विरोधी पक्षात असताना याच क्षारयुक्त पाण्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले आहे. आज तेच आंदोलकांना भेटायला तयार नाहीत.
तोंड बंद ठेवावे म्हणून पैसे वाटप :पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ही मोगलाई आहे का? शाळेच्या अभ्यासक्रमातून, पुस्तकातून मुघलांचे धडे काढले असतील, परंतु प्रत्यक्षात आचरणात तुम्ही मोगलाई आणत आहात. या महाराष्ट्रात औरंगजेबाचा राज्य आणला आहे का? हे फडणवीसांनी स्पष्ट करावे. खारघर प्रकरणावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. तिथे लोकांनी तोंड बंद ठेवावे, म्हणून पैसे वाटप सुरू आहे. पूर्ण पद्धतीने दबाव तंत्र सुरू आहे. श्री सेवकांच्या मृत्यू संदर्भात जास्त चर्चा होऊ नये, यासाठी अशा प्रकारचे दबाव घराघरात जाऊन केले जात आहेत. सरकारने मृतांचा आकडा लपवलेला आहे. त्यामुळे गावागावात आम्ही कार्यकर्ते पाठवले आहेत. मृतांचा निश्चित आकडा लवकरच कळेल.
ते फडणवीस कुठे आहेत :पालघरमध्ये तीन साधूंची जमावाने हत्या केली होती. झाला प्रकार दुर्दैवी होता. पण, ही हत्या सरकारने घडवून आणली, असा त्यावेळी आरोप करण्यात आला होता. संपूर्ण राष्ट्रीय मीडियात याचा वार्तांकन सुरू होते. स्वतः फडणवीस आणि भाजपचे नेते डहाणूत ठाण मांडून बसले होते. या पालघर हत्याकांडाच्या वेळी आंदोलन करणारे देवेंद्र फडणवीस आता कुठे आहेत? आता त्या फडणवीसांच्या डोळ्यात साधी दया माया देखील दिसत नाही. खारघर येथे ज्या काही श्री सदस्यांचा मृत्यू झाला आमच्या मते ते देखील साधूच होते. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या सरकार विरोधात सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल का नाही झाला? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : Sanjay Raut News: अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर, म्हणाले...