मुंबई- लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या स्थलांतरित कामगारांच्या तिकिटांच्या खर्चाचा प्रश्न सोडविण्यासाठी, दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी 'एक तिकीट माणुसकीचे' नावाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून, दक्षिण-मध्य मुंबईतील दानशूर व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन स्थलांतरित कामगारांच्या तिकीटचा खर्च उचलावा, असे आवाहन खासदार शेवाळे यांनी केले आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी शेवाळे यांच्या संपर्क कार्यालयाशी किंवा स्थानिक पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेतंर्गत, चेंबूर येथील माहुल परिसरात अडकलेल्या सुमारे 1200 ओडिसी कामगारांच्या रेल्वे तिकीटाचा खर्च करण्याची तयारी खासदार शेवाळे यांनी दाखवली आहे. त्यामुळे या कामगारांना दिलासा मिळाला आहे.
मूळचे ओडीसाचे हे कामगार गेल्या 40 दिवसांपासून चिंतेत आहेत. काम नसल्याने हातात पैसा नाही, खायला पुरेसे अन्न नाही आणि लॉकडाऊनमुळे गावी परतणे शक्य नाही, अशा तिहेरी संकटात सापडलेल्या या कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून ओडिसासाठी रेल्वेची सुविधा होईपर्यन्त या 1200 कामगारांना अन्नधान्य, पाणी आणि सॅनिटायझर किटही खासदार शेवाळे यांच्यावतीने देण्यात येणार आहेत.
औरंगाबाद येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, स्थलांतरित कामगारांच्या तिकिटांचा खर्च करण्यासाठी दक्षिण- मध्य मुंबईतील दानशूर व्यक्तींना मी आवाहन केले आहे. हे आवाहन करत असताना, मी स्वतः 1200 ओडिसी कामगारांच्या तिकीटचा खर्च करण्याची तयारी दाखविली आहे. 'एक तिकीट माणुसकीचे' या योजनेतुन दक्षिण- मध्य मुंबईतील जास्तीत जास्त कामगारांच्या परतीच्या तिकिटांचा खर्च उचलला जाणार असल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.