मुंबई -कोरोना काळात महाराष्ट्र राज्य रुग्णसंख्येत आणि मृत्यूदरातही अव्वल आहे. हा मृत्यूदर कमी करून अधिकाधिक लोकांना कोरोनामुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, राज्य सरकारला या परिस्थितीचे गांभीर्य नाही, अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) केली. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोरोनाच्या वाढत्या मृत्यूदरांचे राज्य सरकारला गांभीर्य नाही नारायण राणे यांची टीका - भाजप बातमी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याचा कारभार सांभाळत आहेत. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना राज्य सरकारकडून केल्या जात नाहीत, असे आरोप भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केले आहेत.
राणे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. मृत्यूदराचे टक्केवारीही कमी होत नाही. तरी राज्याचे मुख्यमंत्री हे घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सवर राज्य कारभार सांभाळत आहेत. ‘सामना’ मुखपत्रातून मुलाखत देताना कोरोना परिस्थितीचा उल्लेख करत नाहीत. या मुलाखतीतून ते आपले अज्ञान जनतेला दाखवून देतात. मुख्यमंत्री घरातच बसून राहिल्यामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचाच दबाव नाही. या साऱ्या गोष्टीमुळे आपले राज्य सर्वच क्षेत्रात पिछाडीवर जात आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही राज्य सरकार कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहे. सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नसून हत्या आहे. या प्रकरणी पाटणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी अजूनही गुन्हा नोंदविला नाही, असे राणे म्हणाले. या प्रकरणात जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्विटमध्ये काहिही चुकीचे नाही तेव्हा त्यावर कोणाला टीका करण्याचाही अधिकार नाही, असेही राणे म्हणाले.