महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेकाप, रिपब्लिकन आणि रासप या छोट्या पक्षांचे लोकसभेतील अस्तित्व संपले?

या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीच्या राजकारणाचा मोठा फटका या छोट्या पक्षांना बसला आहे.

By

Published : Mar 29, 2019, 10:01 AM IST

Updated : Mar 29, 2019, 10:19 AM IST

महाराष्ट्रातील छोट्या राजकीय पक्षांचे नेते

मुंबई - पहिल्या लोकसभेपासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या शेतकरी कामगार पक्षाला आघाडीने एकही जागा दिली नाही. यामुळे या पक्षाचे अस्तित्व लोकसभेत उरणार नाही. तसेच, रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार ही या निवडणुकीत नसल्याने राज्यातल्या छोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आतापर्यंत या पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत हे पक्ष रिंगणातून हद्दपार झाले आहेत.


या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीच्या राजकारणाचा मोठा फटका या छोट्या पक्षांना बसला आहे. भाजप आणि शिवसेना युतीने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन युतीला तर महाघाडीने अन्य रिपब्लिकन पक्षांना संधी दिली नाही. तसेच, शेतकरी कामगार पक्ष आघाडीत सामील होऊनही त्यांना एकही जागा देण्यात आलेली नाही.

लोकसभेतील या छोट्या राजकीय पक्षांचा आलेख

शेतकरी कामगार पक्ष


- शेकाप १९५२ पासून निवडणूक लढवत आहे. मात्र, कालांतराने पक्षाला उतरती कळा लागली. राज्यात रायगड आणि सोलापुरातील सांगोला विधानसभा मतदार संघात पक्षाला जनाधार आहे. मागील निवडणुकीत रायगड आणि सिंधुदुर्ग मतदार संघात निवडणूक लढवली होती. एकेकाळी शेकापने कुलाबा मतदार संघातून राजाराम राऊत, दिनकर पाटील आणि रामशेठ ठाकूर यांना संसदेत पाठवले होते.

रिपब्लिकन पक्ष ( आठवले)

रामदास आठवले हे १९९६ पासून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांना १९९८ मध्ये दक्षिण मध्य मुंबईतून विजय मिळाला होता. काँग्रेसच्या पाठिंब्यावर १९९९ आणि २००४ ची निवडणूक पंढरपूरमधून लढवली आणि विजयी झाले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीत त्यांचा पराभव झाला. २०१४ साली सातारामधून पक्षाने निवडणूक लढवली. मात्र, यंदा युतीने २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जागा दिली नाही.

राष्ट्रीय समाज पक्ष

- महादेव जानकर हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपसोबत आहेत. २००९ मध्ये माढातून थेट जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी टक्कर घेतली. २०१४ला जानकरांनी बारामतीमधून लोकसभा लढवली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना

- २००९ आणि २०१४ मध्ये तत्कालीन इचलकरंजी आणि हातकणंगले मधून लोकसभा निवडणुक लढवली आणि विजयी झाले. २०१९ मध्ये भाजपशी युती तोडून ते आघाडीसोबत गेले आहेत. यावेळी पक्ष सांगली आणि हातकणंगले जागा लढवणार आहे. स्वाभिमानीतून विभक्त होत सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना काढली. मात्र, त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही.

Last Updated : Mar 29, 2019, 10:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details