मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. रविवारी भक्तांनी मोठ्या भक्तीभावाने दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. नैसर्गिक व कृत्रिम अशा विसर्जन स्थळांवर रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत तब्बल 40 हजार 823 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी 22 हजार 859 मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.
मुंबईत दीड दिवसाच्या 40823 गणेश मूर्तींचे विसर्जन; कृत्रिम तलावात 50 टक्क्यांहून अधिक विसर्जन - कृत्रिम तलावात गणपती विसर्जन
रविवारी मोठ्या भक्तीभावाने दीड दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी निरोप दिला. मुंबईत काल रात्री 12 वाजेपर्यंत दीड दिवसाच्या 40823 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी 22859 मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. कृत्रिम तलावात सार्वजनिक 710 तर घरगुती 22149 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शनिवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. मोठ्या भक्तीभावाने बाप्पाचे आदरतिथ्य केल्यावर काल रविवारी जड अंतःकरणाने भाविकांनी आपल्या दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. रात्री 12 वाजेपर्यंत 40823 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात 978 सार्वजनिक तर 39843 घरगुती मूर्तींचा समावेश आहे. विसर्जना दरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद -
मुंबईत काल रात्री 12 वाजेपर्यंत दीड दिवसाच्या 22859 मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. त्यापैकी सार्वजनिक 710 तर घरगुती 22149 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मुंबईत यंदा दीड दिवसाच्या 50 टक्क्यांहून अधिक मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या आहेत.