मुंबई :जगभरामध्ये हाहाकार पसरवणाऱ्या कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण मार्च 2020 मध्ये आढळून आला होता. त्यानंतर राज्यांमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूच्या चार लाटा येऊन गेल्या. राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा सुरू झाला आहे. 1 मार्च 2023 पासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. हवामानामध्ये आणि ऋतूमध्ये होणाऱ्या बदलामुळे ही रुग्णसंख्या वाढत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यात 125 नवे रुग्ण :11 मार्च रोजी राज्यामध्ये 114 रुग्णांची नोंद झाली आहे. 33 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 486 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 81 लाख 38 हजार 336 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी 79 लाख 89 हजार 426 रुग्ण बरे झाले आहेत. तर एक लाख 48 हजार 424 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 10 मार्चला 93, 9 मार्चला 90, 7 मार्चला 80 तर 3 मार्चला 66 रुग्णांची नोंद झाली होती.
मुंबईत आज 25 रुग्णांची नोंद :आज 11 मार्च रोजी मुंबईमध्ये 25 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 105 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या तीन वर्षात एकूण अकरा लाख 55 हजार 528 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 लाख 35 हजार 676 रुग्ण बरे झाले आहेत, तर 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 10 मार्चला 21, 9 मार्चला 18 तर 2 मार्चला 18 रुग्णांची नोंद झाली होती.
रुग्णालयातील बेड रिक्त :मुंबईमध्ये सध्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात 4350 खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी 5 खाटांवर रुग्ण दाखल असून 1 रुग्ण ऑक्सिजनवर आहे. सध्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करण्याची गरज भासत नाही. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास स्टँडबाय वर असलेली कोविड सेंटर सुरू करून तेथे रुग्णांवरती उपचार केले जातील, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा : Policy For Fishermen : सरकारकडून मच्छीमारांना नुकसान भरपाई धोरण, मच्छिमारांचा विरोध