मुंबई : देशात कोरोनाची लाटेची भीती ( Wake of Corona Infection ) वर्तवली जात असताना निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्यामुळे 2 जानेवारीपासून निवासी डॉक्टर संपावर (Resident Doctors Strike) आहेत. आधीच सर्वसामान्य आजार, हिवताप, मलेरिया, डेंग्यू इतर श्वसनाचे आजार ,गंभीर आजारांच्या महाराष्ट्रात समस्या आहेत. त्यात आता महामारी येण्याची शक्यता आहे आणि डॉक्टरांचा संपांमुळे शासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
डॉक्टरांचा संप :महागाई भत्ता, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, वसतीगृहाच्या समस्या, मुंबई महानगरपालिकेकडून दर महिना मिळणारा प्रलंबित कोविड भत्ता या कारणांमुळे राज्यभरात आज पासून सात हजार निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर आदी रुग्णालयांमध्ये २ हजार डॉक्टर्स कार्यरत आहेत. या डॉक्टरांना कोविड काळातील भत्ता देण्यात आलेला नाही. हा भत्ता देण्याकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेला राज्य सरकार, पालिका प्रशासन, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी चर्चेला बोलावलेले नाही. यामुळे पालिका रुग्णालयातील २ हजार डॉक्टर काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. आज दुसऱ्या दिवशीही या डॉक्टरांनी आपला संप सुरूच ठेवला असून जो पर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा, इशारा डॉक्टरांनी दिला आहे.