मुंबई - पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि कॅबिनेट मंत्री सुनील केदार कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकार पुढे हे अधिवेशन दोन दिवस चालवण्याचे आव्हान आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती विक्रमी संख्या आणि दोन दिवस एकाच ठिकाणी महाराष्ट्रातून येणारे आमदार आणि त्यांचे पीए, अधिकारी या गर्दीत अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 5 सप्टेंबरला राज्यात सगळ्यात जास्त म्हणजे 20 हजार 489 रुग्ण आढळले होते. अशा परिस्थितीत मुंबईत सोमवारपासून दोन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन होत आहे. यासाठी सर्व मंत्री, आमदार, अधिकारी, पीए, पत्रकार यांची कोरोना चाचणी केली जात आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल, त्यांनाच अधिवेशनाला येता येणार आहे. त्यातच अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले मंत्री सुनील केदार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे, कामकाजात आता विधानसभा अध्यक्षसहभागी होणार नाहीत. त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना हे कामकाज पुढे न्यावे लागेल. तर, राज्यात आतापर्यंत साधारणपणे 35हून अधिक आमदार, मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातून काही बरे झाले तर, काहींवर उपचार सुरू आहेत.
कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन दोन वेळा पुढे ढकल्यानंतर अखेरीस 7 आणि 8 सप्टेंबर रोजी ते होणार आहे. मंत्री, आमदार, त्यांचे पीए, शासकीय अधिकारी यांच्या गर्दीत अधिवेशनात कुणाला कोरोनाची बाधा होऊ नये, हेच मोठे आव्हान शासनापुढे असणार आहे. महाराष्ट्राचे अनेक आयएएस अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा झाली. अधिवेशनात शासनाबरोबर प्रशासनदेखील संपूर्ण जोमाने काम करत असते. त्यांच्याबरोबर विधिमंडळाबाहेर पोलीस बंदोबस्त देखील तैनात असतो. त्यामुळे अधिवेशनात लोकप्रतिनिधींबरोबर प्रशासनातील कर्मचारी, पोलीस यांना कोरोनाची बाधा होऊ नये, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
आमदार आणि मंत्री यांना फक्त एकच पीए हा विधिमंडळात बरोबर आणण्याची परवानगी दिलेली आहे. लोकप्रतिनिधींच्या स्टाफच्या जेवणाची सोय देखील विधिमंडळाच्या बाहेर करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारे अधिवेशन हे जितके आव्हानात्मक आहे, तितकेच ते वेगळे ठरणार आहे.