मुंबई Money Laundering Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलं सलील आणि ऋषिकेश देशमुख यांना विशेष सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय. कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात दोघांचे पासपोर्ट ईडीच्या ताब्यात होते. या प्रकरणी बुधवारी (29 नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीत ईडीनं सलील आणि ऋषिकेश यांना त्यांचे पासपोर्ट परत द्यावेत, असे आदेश विशेष न्यायालयानं दिले. त्यानंतर सलील आणि ऋषिकेश देशमुख यांनी जपानला जाण्यासाठी परवानगीचा अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणीवेळी, न्यायालयाच्या अनुमतीशिवाय देश सोडून जाता येणार नाही, असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात 30 नोव्हेंबर रोजी न्यायालयानं आदेश जारी केले आहेत.
जपानला जाण्यासाठी अनुमती मिळावी :यासंदर्भात नोव्हेंबर 2022 मध्ये विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. परंतु त्यावेळेला काही अटी-शर्तीं लावण्यात आल्या होत्या. यावेळी दोघांचेही पासपोर्ट अंमलबजावणी संचलनालयाकडं जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. यावेळी अनिल देशमुख यांच्या दोन्ही मुलांसंदर्भात वकील इंद्रपाल सिंग यांनी न्यायालयाला विनंती केली की, दोन्ही बंधू व्यवसायाच्या निमित्तानं जपानला एका प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना तिथं जाण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळणं आवश्यक आहे.