मुंबई- लोकल रेल्वेत मोबाईल चोरांचा सूळसुळाट झाला आहे. मुंबईच्या मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर दररोज एकूण ८० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या मार्गावरील गाड्या मोबाईल चोरांसाठी सर्वाधिक सोयीच्या झाल्या आहेत. गेल्या सहा वर्षात लोकल ट्रेनमध्ये ५९ हजार ९०४ मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. याची किंमत ९९ कोटी, ४६ लाख, ९६ हजार, ९८१ रुपये असल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे २०१३ पासून मे २०१८ पर्यंत उपनगरीय गाड्यात किती मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे, तसेच किती किंमतीचे मोबाईल चोरी गेले आणि त्यापैकी किती किंमतीचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे, याबाबत माहिती विचारली होती.
१ जानेवारी २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ५९९०४ मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या सहा वर्षात ९९ कोटी, ४६ लाख, ९६ हजार, ९८१ रुपये इतकी किंमतीच्या मोबईल फोन चोरी झाली आहे. यापैकी फक्त ८८६८ मोबाईल मिळाले आहेत. तर १० कोटी ३८ हजार १५२ रुपये किंमतीचे मोबाईल मिळाले आहेत. म्हणजेच चोरी झालेल्या मोबाईलपैकी फक्त १० टक्के मोबाईल परत मिळाले आहेत.
२०१३ मध्ये एकूण १ कोटी ४६ लाख ६४ हजार ५७० रुपये किंमतीचे १०४५ मोबाईल चोरीला गेले असून यापैकी फक्त ७१० मोबाईल मिळाले आहे. ज्याची किंमत ७० लाख ४९ हजार ४४७ इतकी आहे. यापैकी फक्त १० टक्के चोरी झालेले मोबाईल मिळाले आहेत.