मुंबई - मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी म्हणून स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हिंदुत्वाचं कार्ड खेळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत महाआघाडी स्थापन केल्यानंतर शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न मनसे करणार आहे. मनसे आपल्या पक्षाच्या झेंड्याचा रंगही बदलणार असून येत्या 23 जानेवारीला होत असलेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे याबाबतची घोषणा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नव महाराष्ट्राची निर्मिती तसेच मराठी माणसाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला टोल, दुकानांवर मराठी पाट्या आणि रेल्वे भरतीमध्ये मराठी माणसाला प्राधान्य या मुद्यावर मनसेने केलेल्या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. 2009 साली झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. त्यानंतर मात्र, मनसेचे हे मराठी कार्ड फार चालले नाही. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी दमछाक झाली. या दोन्ही निवडणुकीत त्यांचा एक-एकच आमदार निवडून आला. मनसे अध्यक्षांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचे मतात परिवर्तन झाले नाही. त्यामुळेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली राजकीय भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.