महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचे राज्यव्यापी आंदोलन - मनसेचे राज्यव्यापी आंदोलन

MNS Agitation
मुंबई

By

Published : Nov 26, 2020, 11:35 AM IST

Updated : Nov 26, 2020, 8:09 PM IST

17:08 November 26

वीजबिल मागायला कोण आलं तर त्याच्या कानाखाली शॉक बसेल; मनसेचा इशारा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

मुंबई- कोरोनाकाळातील महिन्यामध्ये वाढलेले अवाजवी वीजबिलांमध्ये माफी द्यावी यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. आज मुंबईत बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोणी वीजबिल भरू नका आणि जर वीजबिल मागायला कोण आलं तर त्याच्या कानाखाली शॉक बसेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.  

16:59 November 26

पुण्यात मोर्चा काढण्यासाठी जमलेल्या मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड

पुणे - महावितरणकडून आकारल्या जाणाऱ्या वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज पुण्यात आंदोलन केले जाणार होते. पुण्यातील शनिवारवाडापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही शेकडो कार्यकर्त्यांची शनिवारवाडा परिसरात एकत्र येऊन मोर्चा काढण्यासाठी तयारी सुरू होती. मात्र, यावेळी मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दोन तास चाललेल्या नाट्यमय घडामोडीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही सोडून देण्यात आले.  

16:22 November 26

वाढीव वीजबिलांविरोधात मनसेचे पालघरमध्ये आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालघर - महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली वाढीव वीजबिले माफ करण्यास नकार दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पालघर येथे देखील मनसेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.


 

16:20 November 26

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

रत्नागिरी -वाढीव वीजबिलांविरोधात आज रत्नागिरीतसुद्धा मनसेने धडक मोर्चा काढला. रत्नागिरीतील मारुती मंदिरापासून या मोर्चाला सुरवात झाली. हा मोर्चा पायी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी वाढीव वीजबिलांचे विरोध करत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.


 

15:46 November 26

ठाण्यात मनसेचे वीजबिल आंदोलन पेटले; मनसैनिक-पोलीस आमनेसामने

ठाण्यात मनसेचे वीजबिल आंदोलन पेटले

ठाणे - मनसेने काढलेल्या विराट मोर्चाला पोलिसांनी ठाण्यात अडवल्याने मोठा वाद निर्माण झाला. लॉकडाऊन काळात सामान्यांना आलेल्या अधिकच्या वीजबिलांविरोधात मनसेने दंड थोपटले आहेत. आज ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एका विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो मनसैनिक आणि सामान्य ठाणेकर या मोर्चात सामील झाल्याने रस्ते मनसेच्या झेंड्यानी फुलून गेले होते. यावेळी काहीकाळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  

15:33 November 26

नागपुरात मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक

नागपूर -लॉकडाऊनच्या काळात आलेले वाढीव वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी नागपुरात मनसेने आज मोर्चा काढला. मनसेचे विदर्भ प्रमुख हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून हा मोर्चा निघाला. मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी मोर्चा अडवून धरल्यामुळे मनसेच्या चार नेत्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन सादर केलं.  

14:51 November 26

मनसेचे बांद्रातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई  - वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने आज रा्ज्यभर आंदोलन सुरू केले आहे. बांद्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. कोरोनाकाळात नागरिकांकडे नोकरी नसल्यामुळे वीजबिलासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.  

14:26 November 26

अहमदनगरमध्ये मनसेकडून अधिकाऱ्यांच्या दालनाची तोडफोड

वाढीव वीज बिलाविरोधात मनसेच्या वतीने राज्यभरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोपरगाव शहरात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन खळखट्याक आंदोलन केले असून विजवितरण कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या दालनाची तोडफोड केली आहे. तसेच खुर्च्यांची तोडफोड केली आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही शासनाला जाग येत नसल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

13:21 November 26

नाशकात वीज बिलांच्या माळा गळ्यात घालत मनसेचे आंदोलन

राज्यातील वाढीव वीज बिल विरोधात आज राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढत वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी केली. यावेळी नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी गळ्यात वाढीव वीज बिलांच्या माळा घालून टाळ वाजवत ठाकरे सरकारचा निषेध केला.

12:46 November 26

ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की; जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि कार्यकर्ते ताब्यात

 ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने आले आहेत. मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. मनसे नेते अभिजित पानसे,ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

12:44 November 26

ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

ठाण्यात मनसे कार्यालयाबाहेर मनसेच्या घोषणाबाजीला सुरुवात झाली आहे. पोलीस कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यकर्ते आक्रामक झाल्यास पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. 

12:23 November 26

मुंबईतील बांद्रात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते जमले

बांद्रा येथील मनसे मोर्चाची दृश्ये

मुंबईतील बांद्रात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते जमले आहेत. परवानगी नसूनही मोर्चा काढण्यात येत आहे. 

12:01 November 26

औरंगाबादेत परवानगी नसूनही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम

वाढीव वीजबिल विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. औरंगाबादेत विज बिलाविरोधातील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरी देखील आंदोलन होणारच, अशी भूमिका मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी जाहीर केली.

12:00 November 26

जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेची निदर्शने

जालना: वीजबिल माफीसह आत्महत्याग्रस्त शेतकरी शेतकरी कुटुंबीयांच्या नातेवाईकांना मदत मिळावी. तसेच बचत गटांना कर्ज मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

11:57 November 26

वर्ध्यात मनसेचे आंदोलन

वर्ध्यातही मनसेचे वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. हिंगणघाट येथील आंबेडकर चौकात हे आंदोलन केले जाणार आहे. 

11:55 November 26

पुण्यात मनसेला मोर्चा न काढण्याच्या दिल्या होत्या सुचना

मोर्चा न काढण्यासाठी पोलिसांनी सुचना दिल्या होत्या. मात्र, तरीही मोर्चा काढल्यास कार्यकर्त्यांना कलम १४९ नुसार ताब्यात घेतले जाणार आहे.  

11:40 November 26

पुण्यात आंदोलनकर्त्यांची धरपकड

पुण्यात मनसे आंदोलनकर्त्यांची धरपकड

वाढीव विज बिल माफ करण्यात यावे, या मागणीसाठी पुण्यात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. परंतू पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मोर्चासाठी जमलेल्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. 

11:38 November 26

बांद्र्यात कार्यकर्ते जमण्यास सुरुवात

राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

11:37 November 26

मुंबई, पुणे आणि ठाण्यात मोर्चाला परवानगी नाकारली

मुंबई, पुणे आणि ठाण्यात मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, तरीही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. 

07:33 November 26

वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचे आंदोलन..

वाढीव वीज बिलाविरोधात मनसेने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. मनसेच्या आजच्या आंदोलनाला मुंबईत परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, तरीही आंदोलन करण्यावर मनसे ठाम आहे. पुणे, ठाणे येथेही मनसेच्या मोर्च्याला परवानगी नाकारण्यात आली आहे. 

Last Updated : Nov 26, 2020, 8:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details