मुंबई -नवी मुंबईतील नेरुळ-जुईनगर भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ येथील मनपा विभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक व नागरिक उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी छायाचित्रांसहित नागरी समस्यांचा पाढा विभाग अधिकारी संजय तायडे यांच्यासमोर वाचला. यावेळी विभाग अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती.
गेल्या कित्येक दिवसांपासून नेरुळ व जुईनगर भागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या नागरी समस्यांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डे, उखडलेले पदपथ, गटारांची तुटलेली झाकणे, मोडकळीस आलेली गटारे, रस्त्यांवर असलेले कचऱ्याचे ढीग व त्यामुळे निर्माण झालेली रोगराई, बंद अवस्थेतील पथदिवे व हायमास्ट, दुकानदारांनी अवैधरित्या अडवलेली मार्जिनल स्पेस, पदपथ व रस्ते अडवून बसलेले अनधिकृत फेरीवाले आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कधीही न पाहवयास मिळणारी औषध व धूर फवारणी, उद्यानांची आणि मैदानांची झालेली दुरवस्था, अनधिकृत गॅरेजेस व त्यांची रस्त्यांवरील बेवारस वाहने, रमेश मेटल क्वारी येथे नागरिकांना होणारा अपुरा पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांमुळे नागरिक बेजार झाल्याचे मनसे शहर सह-सचिव शशिकांत कळसकर व विनय कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.