मुंबई -उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. अदानी समूहाने आता जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली आहे. मात्र, याप्रकरणी दोन दिवसातच वाद सुरू झाले आहे. आरपीजी समूहाचे मालक हर्ष गोएंका यांनी या विमानतळाबाबत केलेल्या ट्विट केलेल्या एका व्हिडिओ वादंग निर्माण झाले आहे. फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेले आहे. विमानतळ मुंबईमध्येच आहे. आम्हाला डिवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिला.
व्हिडिओ व्हायरल -
१७ जुलैला हर्ष गोयंका यांनी ‘मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याबद्दल साजरा केला आनंद’ अशी कॅप्शन लिहून तिथे सुरू असलेला एक गरबा व्हीडिओ ट्विट केला. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानी समूहाकडे देण्यात आला आहे. त्याच निमित्ताने हर्ष गोयंका यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे. या व्हीडिओत काही तरूण-तरूणी मास्क घालून गुजरातमधील पारंपारिक नृत्य गरबा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. यामुळे वाद निर्माण झालेला आहे.