मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच भाजपने व्यंगचित्र काढत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. आता टीकेमुळे घायाळ झालेल्या मनसेने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यंगचित्र काढत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
हेही वाचा -निवडणुकीत महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व्हावी - अशोक चव्हाण
या व्यंगचित्रामध्ये मुख्यमंत्र्यांचे चित्र काढण्यात आले असून मनसे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या बातमीनेच थापड्यांचे पाय लटलटले, असा उल्लेख करण्यात आला आहे. 'मनसे अधिकृत' नावाच्या ट्विटर हँडलवरून हे व्यंगचित्र टाकण्यात आले आहे.
- असे होते भाजपचे व्यंगचित्र -
या व्यंगचित्रात राज ठाकरे सोंगटी खेळाच्या मधोमध उभे आहेत, असे दाखवण्यात आले आहे. 2004 च्या चौकटीत शिवसेना, 2009 च्या चौकटीत मनसे दाखवण्यात आली आहे. तर 2019 लोकसभा निवडणुकीच्या 2 चौकटी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांच्या चौकटीत उभे राहिले आहेत, असे दाखवण्यात आले आहे. त्यापुढे 2019 ची विधानसभा निवडणुकीची चौकट आहे, त्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार? असा प्रश्न विचारुन भाजपाने राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. निवडणूक जाहीर होताच भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवणारे व्यंगचित्र 'भाजपा महाराष्ट्र' या ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहे.
हेही वाचा - मोबाईलवरून महिलांशी अश्लील संवाद साधणाऱ्या सिक्युरीटीला हरयाणातून अटक