मुंबई - राज्यात सक्षम विरोधीपक्ष बनवण्यासाठी माझ्या पक्षाला मतदान करा, असे आवाहन करत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत धुरळा उडवला होता. मात्र, पक्षाला म्हणावे तसे यश संपादन करता आले नाही. सक्षम विरोधी पक्षनेते बनण्यासाठी नेत्यांनी तळागाळात उतरून काम करावे, असा सूर मनसेच्या बैठकीत तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांनी काढला. मनसेचे मुख्य कार्यालय असलेल्या राजगड येथे मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील जिल्हा आणि तालुका अध्यक्षांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी आपले म्हणणे मांडले.
ओला व कोरड्या दुष्काळामुळे राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे. मोठ्या प्रमाणात बंद होत चालेले उद्योगधंदे यामुळे मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढत आहे. शेती व बेरोजगारी हे प्रश्न आवासून जनतेच्या समोर उभे आहेत. हे दोन्ही प्रश्न केंद्रीत करून मनसे यापुढे काम करणार आहे. मनसेने महाअधिवेशन घ्यावे, असा सूर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काढला आहे. मनसे पक्ष भक्कम आणि पुन्हा एकदा सक्षमपणे उभारी घेईल, याची खात्री असल्याचे मनसे नेते बोलत आहेत.