मुंबई- काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायू दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र नेस्तनाबूत केली. याचा आनंद देशभर व्यक्त केला जात आहे. पालिका सभागृहातही त्याबाबत भाषणे ठोकून अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, त्याच वेळी मनसेचे एकमेव नगरसेवक असलेल्या संजय तुर्डे यांनी पुलवामा येथे वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आपले वर्षभराचे मानधन देऊन आगळी-वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे.
जम्मू काश्मीर येथील पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये भारताच्या ४९ सैनिकांना वीरमरण आले होते. याचा बदला घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरावर केली जात होती. मंगळवारी पहाटे भारतीय वायू दलाने पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी केंद्रांवर हल्ला करत ती केंद्र उध्वस्त केली. वायू दलाने केलेली कामगिरी समजताच देशभरात सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातही भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला. पालिका सभागृहात भारतीय वायू दलाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला.