महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राला स्वतंत्रपणे कोरोना लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र

राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे

राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र
राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र

By

Published : Apr 14, 2021, 2:54 PM IST

मुंबई-महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे चिंताजनक परिस्थिती तयार झाली आहे. लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. यासंबंधी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली आहे. या मागणीसह पाच मागण्या केल्या राज ठाकरेंनी केल्या आहेत. या पत्राद्वारे महाराष्ट्रातील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती जाणीव करून दिली आहे.

पत्रातील मुद्दे
गेल्या वर्षी कोविड-१९ ची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्र राज्याला या साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्रात निव्वळ आकड्यांमधे मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यूदेखील झाले आहेत. आज सारा देश कोविड-१९ च्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातली परिस्थिती सर्वात बिकट आहे.

राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?

कोविड-१९ ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण अजूनही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?

१००% लोकांचे लसीकरण करावे
या पार्श्वभूमीवर करोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १००% लसीकरण करण्याची रणनिती महाराष्ट्रासाठी महत्वाची, व कळीची आहे.म्हणूनच, महाराष्ट्राला १००% लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून, राज्यातल्या सर्व वयोगटातील १००% लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवंय.


प्रमुख मागण्या

अ) महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या;

ब) राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात;

क) ‘सिरम’ला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी;

ड) लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हॉफकिन व हिंदुस्तान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी; आणि

इ) कोविड-१९ रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.

या कोविड-१९ च्या साथीमुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला तिथल्या स्थानिक परिस्थितीनूसार धोरण आखण्याची गरज आहे. ‘आरोग्य’ हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहनच द्यावे. यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, ज्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details